1 जूननंतर महाराष्ट्र कसा असेल ?, मुख्यमंत्री ठाकरेंनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने 21 मार्च रोजी देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यानंतर तब्बल तीन वेळा लॉकडाऊन केंद्र सरकारनं मुदतवाढ दिली. चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनची मुदत तीन दिवसांनी म्हणजेच 31 मे रोजी संपत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सरकार लॉकडाऊनबद्दल काय निर्णय घेणार याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहेत. एक जूनपासून लॉकडाऊन हटवणार की, आणखी शिथिलता देऊन कायम ठेवणार, एक जूननंतरचा महाराष्ट्र कसा असेल ? या प्रश्नाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं.

एका वेबसाईटच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वेबसंवाद या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील परिस्थीतीची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनाबरोबर जगायला शिका हे म्हणणं ही आपली अपरिहार्यता आहे. त्यामुळे लॉकडाऊन हा शब्द वापरणं आता बंद करायला हवा. कोरोनानंतरचं जग बदलेलं असेल. कोरोनासोबत जगायचं म्हणजे आपल्या जीवन शैली बदलायची. लॉकडाऊन हा शब्द म्हणण्यापेक्षा स्वत: लॉक सोबत घेऊन फिरा, असे आपल्याला म्हणावं लागणार आहे. मास्क घालणे, सुरक्षित अंतर राखणं, सॅनिटायझर वापरणं, वारंवार तोंडाला हात न लावणं अशी खबरदारी आपल्याला घ्यावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर राज्य सरकारला परिस्थितीची कल्पना आली होती. त्यामुळे काय काय करता येईल, याची तयारी सुरु केली होती. आरोग्याच्या सुविधा उभारण्यासाठी लष्कराचं मार्गदर्शन घेण्याची, ते तातडीनं हॉस्पिटल आणि अन्य सुविधा कशा उभ्या करतात, याचीही माहिती घेण्याची तयारी होती. पण त्यापूर्वीच लॉकडाऊन जाहीर झाले. केंद्राने लॉकडाऊन जाहीर करण्याआधी राज्य सरकारनं एक एक गोष्ट बंद करायला सुरुवात केली. आता लॉकडाऊन उठवताना एकदम उठवता येणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.