शिवसेना-राष्ट्रवादीचे ‘सर्च’ ऑपरेशन ‘सक्सेस’फूल, ‘गायब’ झालेले ‘हे’ आमदार सापडले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना आज सकाळी घडली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे संपूर्ण राज्यात एकच गोंधळ उडाला. या राजकीय घडामोडीनंतर राज्यातील हालचालींना वेग आला. दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन घडलेला प्रकार सांगितला. आणि राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी अजित पवारांसोबत बंडखोरी केल्यावर शिक्कामोर्तब झाले.

अजित पवार यांच्यासोबत बंडखोरी करणारे उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने संयुक्त शोधमोहिम राबवून शोधून काढले आहे. सकाळपासून बाबासाहेब पाटील आणि संजय बनसोडे हे गायब होते. संजय बनसोडे हे मुंबईतून विमानाने दिल्लीला जाणार असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत होती. मात्र, सकाळपासून नॉट रिचेबल असलेले बनसोडे यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यासोबत असल्याचे फोनद्वारे माहिती दिली.

संजय बनसोडे हे गायब असल्याने शिवसेना-राष्ट्रवादीने त्यांचा संयुक्त शोध घेतला. राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे, शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांनी एकत्रित शोधमोहिम घेत सकाळपासून गायब असलेल्या संजय बनसोडे यांना सायंकाळी मुंबई विमानतळावरून ताब्यात घेऊन त्यांना राष्ट्रवादीची सुरु असलेल्या बैठकीच्या ठिकाणी घेऊन गेले.