शिवतीर्थावर राज ठाकरे आणि CM उद्धव ठाकरेंची ‘गळाभेट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईच्या शिवतीर्थावर आज उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्याला राज्यातील तसेच इतर राज्यातील नेत्यांनी हजेरी लावली होती. मात्र, सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे. राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याला येणार का असा प्रश्न सर्वांना पडला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना फोन करुन शपथविधी सोहळ्यात उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. राज ठाकरे यांनी देखील निमंत्रण स्वीकारत कार्यक्रमाला हजेरी लावली.

महाराष्ट्राच्या राजकाणामुळे अनेक नाती दुरावली. यामध्ये ठाकरे कुटुंबही आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे वेगळे झाले. यानंतर त्यांची अनेक कार्यक्रमांमध्ये भेट झाली तरी कधी हस्तांदोलन केले नाही. मात्र आजच्या शपथविधी सोहळ्यात राजकारण वेगळं आणि कुटुंब वेगळं हे पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिले. उद्धव ठाकरे यांनी स्वत: फोन करून राज ठाकरे यांना निमंत्रण दिले. दिलेलं निमंत्रण स्वीकारत आई आणि मुलगा अमित सोबत राज ठाकरे भाऊ उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला हजेरी लावली. राज ठाकरे यांना व्यासपिठावर बसवण्यात आले.

शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर अनेकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मात्र, सगळ्यांना उत्सुकता होती ती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीची. शपथविधी सोहळ्यानंतर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दोघा ठाकरे भावांनी एकमेकांची गळाभेट देखील घेतली. दरम्यान, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून पाहिल्यावर राज ठाकरे यांच्या आईच्या डोळ्यात पाणी आल्याचे पहायला मिळाले.

Visit : Policenama.com