‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’वर यंदा ‘कोरोना’चे संकट !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – प्रतिवर्षी आयोजित होणाऱ्या ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’वर यंदा कोरोनाचे संकट घोंघावत आहे. कोरोनाच्या अनुषंगाने राज्य सरकारने सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी दिली आहे; पण त्यासाठी प्रवेश मर्यादा निश्चित केली आहे. तसेच दरवर्षी महोत्सवाला येणाऱ्या दर्दी रसिकांची संख्या लक्षात घेता, यंदा महोत्सवाच्या आयोजनाबद्दल एक प्रकारची अनिश्चितता आहे.

डिसेंबर महिन्याच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने ‘सवाई गंधर्व भीमसेन’ संगीत महोत्सव आयोजित करण्यात येतो. सूर, लय, ताल अशा त्रिवेणी संगमातून साकार झालेल्या या महोत्सवात नव्या-जुन्या पिढीतील दिग्गज कलावंतांचे सुरेल आविष्कार अनुभवण्याची संधी रसिकांना मिळते. यामुळे रसिक या महोत्सवाची आतुरतेने वाट पाहतात. राज्य सरकारने सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी दिल्याने रसिकांच्या महोत्सवाविषयी आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, सरकारने अद्यापही मोठ्या कार्यक्रमांना परवानगी न दिल्याने आयोजक वाट पाहत आहेत.

दरम्यान, यासंदर्भात आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी महोत्सवाच्या आयोजनाबाबत अनिश्चितता व्यक्त केली. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला देश-विदेशासोबत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कानसेन हजेरी लावतात. स्वरमंडपात बसून कलाकारांना ऐकणे ही रसिकांसाठी सुखद अनुभूती असते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने मोठ्या कार्यक्रमांना परवानगी दिलेली नाही. ऑनलाइन महोत्सवात हा अनुभव मिळणे शक्य नसल्याने, ऑनलाइन करण्याबाबतची शक्यता त्यांनी फेटाळली. तसेच सरकारने परवानगी दिल्यास ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’बद्दल विचार करू, असेही त्यांनी सांगितले.