विद्यापीठांचे शैक्षणिक वर्ष सुरु होणार नोव्हेंबरपासून

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनानंतर आता देशभरातील विद्यापीठांतील प्रथम वर्षांचे नवे शैक्षणिक वर्ष 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या समितीने घेतला आहे. राज्यातील विद्यापीठांना 18 नोव्हेंबरपासून नवे वर्ष सुरू करण्याची मुभा मिळणार आहे.

कोरोनामुळे उच्चशिक्षण संस्थांचे हे शैक्षणिक वर्ष अद्यापही सुरळीत झाले नाही. द्वितीय, तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांचे पुढील सत्राचे ऑनलाइन वर्ग सुरू झाले आहेत. प्रथम वर्षांचेही ऑनलाइन वर्ग विद्यापीठांत सुरू झाले आहेत. मात्र, अद्यापही केंद्रीय शिक्षण मंडळाच्या श्रेणीसुधार परीक्षेचा निकाल जाहीर झालेला नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत.

त्याचप्रमाणे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा खोळंबल्यामुळे त्याचेही प्रवेश झालेले नाहीत. अंतिम वर्षांच्या पदवीच्या परीक्षा ऑक्टोबरमध्ये होणार आहेत. त्यामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमांचीही प्रवेश प्रक्रिया झालेली नाही. या पार्श्वभूमीवर अद्यापही सुरू न झालेल्या सर्व अभ्यासक्रमांचे नवे शैक्षणिक वर्ष 1 नोव्हेंबरपासून सुरू होणे अपेक्षित आहे. मात्र, प्रवेश प्रक्रिया किंवा निकालाचे काम पूर्ण झाले नसल्यास वर्ष सुरू करण्यासाठी 18 नोव्हेंबपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. यंदा मात्र या सुट्टयांमध्ये कपात होणार आहे.