Gym होणार UNLOCK, राज्यात ‘या’ तारखेपासून कंटेनमेंट झोन वगळता सुरू होतील ‘जिम’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   उद्धव ठाकरे सरकारनं अखेर अनलॉकच्या 5 व्या टप्प्यात जिम उघडण्यास परवानगी दिली आहे. येत्या 25 तारखेपासून कंटेनमेंट झोन वगळता राज्यात सर्वत्र जिम सुरू होतील. केंद्र आणि राज्य सरकारनं जाहीर केलेल्या नियमांचे पालन करून जिम सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

23 मार्च ते 31 मे दरम्यान वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वत्र लॉकडाऊन लागू करण्यात होते. त्यांनतर अनलॉकच्या टप्प्यांमध्ये अर्थव्यवस्थेची एक-एक कडी खुली करण्यात आली. दरम्यान आता उद्धव ठाकरे सरकारकडून 25 तारखेपासून जिम सुरू करण्याला परवानगी देण्यात आली आहे. जिम SOS नुसार सुरू होणार आहे.

जिममध्ये जाताना नागरिकांनी मास्क परिधान करणे अनिवार्य असेल तसेच सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे देखील अनिवार्य असणार आहे. या व्यतिरिक्त जिममध्ये थर्मल स्क्रिनिग आणि सॅनिटायझेशन अत्यावश्यक असणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जिम सुरू करण्यासाठी मागणी होत होती, अखेर याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान महाराष्ट्रात रिकव्हरी रेट हा 88 टक्क्यांच्याही पुढे गेला आहे. गुरुवारी सुमारे 16 हजार 177 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 16 लाख 31 हजार 856 वर पोहोचली आहे. दरम्यान दिवसभरात राज्यात 7539 नवीन रुग्ण समोर आले आणि 198 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात मृत्यू दर 2.64 टक्क्यांवर पोहोचला आहे.

You might also like