भाजपला हादरा ; ‘त्या’ महिला खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेश मधील भाजप खासदार सावित्रीबाई फुले यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्या बहराईच लोकसभा मतदार संघातून २०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. काल शनिवारी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, महासचिव प्रियंका गांधी वाड्रा आणि पश्चिम उत्तर प्रदेशचे प्रभारी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

उत्तर प्रदेशातील दलित नेत्या म्हणून सावित्रीबाई फुले या ओळखल्या जातात. त्यांनी भाजपची साथ सोडल्याने त्याचा परिणाम उत्तर प्रदेशातील भाजपच्या दलित मतावर होणार आहे. त्यामुळे हा भाजपसाठी मोठा हादरा मानण्यात येतो आहे.

सावित्रीबाई फुले यांनी डिसेंबर २०१८ मध्ये भाजपला अखेरचा ‘जय श्रीराम’ घातला होता. त्यावेळी त्यांनी आपण कोणत्या पक्षात जाणार आहे हे मात्र जाहीर केले नव्हते. भाजप सोडण्याआधी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली होती. भाजप समाजात दुफळी माजवण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच राम मंदिराचा मुद्दा भाजपला गरिबांना रोजगार देण्याहून महत्वाचा वाटतो असे सणसणित टोले सावित्रीबाई फुले यांनी भाजपला लगावले होते. तसेच भाजप सरकारच्या काळात दलितांवर हल्ले वाढल्याचे देखील सावित्रीबाई फुले यांनी म्हणले होते. त्यांनी भाजपवर अशी खरमरीत टीका केल्या नंतर दोन दिवसातच भाजपला सोडचिठ्ठी दिली. काँग्रेसमध्ये प्रवेश करते वेळी त्यांनी इथूनपुढे आपण भाजप मध्ये कधीच जाणार नाही असे हि म्हणले आहे.