UPSC च्या मुलाखतीत सांगितलं, IAS कशामुळं बनायचंय हे माहिती नाही, मग झालं ‘असं’ काही

पोलीसनामा ऑनलाईन टीम : यूपीएससीची परीक्षा जितकी कठीण असते तितकीच कठीण मुलाखत ही होते. ज्यामध्ये असे प्रश्न विचारले जातात की ज्यांचा अंदाज लावणे अवघड असते. अशा प्रश्नांतून समोर बसलेला उमेदवार अधिकारी होण्यासाठी पात्र आहे की नाही हे पॅनेलला जाणून घ्यायचे असते. आज आम्ही तुम्हाला आयएएस योगेश मिश्राबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी आपल्या मुलाखतीचे अनुभव शेअर केले आहेत. योगेश मिश्रा, यूपीएससी सीएसई 2013 मध्ये पात्र झाले होते. ही कठीण परीक्षा उत्तीर्ण करणारे ते आपल्या कुटुंबातील पहिले व्यक्ती ठरले. योगेश मिश्रा यांनी एका वाहिनीला मुलाखत देताना म्हटले होते की, मला यूपीएससी मुलाखतीत तेच प्रश्न विचारण्यात आले होते जे प्रश्न प्रत्येकाला विचारले जातात.

ते म्हणाले, जेव्हा मी मुलाखत द्यायला गेलो होतो तेव्हा माझ्या मुलाखत समितीच्या मंडळाच्या अध्यक्षांनी मला हा प्रश्न विचारला की, तुम्हाला आयएएस का व्हायचे आहे? योगेश मिश्रा म्हणाले होते की सर्वसाधारण पणे जे कुणी उमेदवार मुलाखतीला जातात, त्या सर्वांना प्रथम हाच प्रश्न विचारला जातो. योगेश म्हणाले, माझी त्यावेळी काहीच स्पष्टता नव्हती की मला आयएएस का व्हायचे होते. म्हणूनच माझ्या तोंडातून आपसूकच बाहेर पडले की- ‘मला स्वतः लाच हे माहित नाही की मला आयएएस का व्हायचे आहे.’ योगेश म्हणाले, हे माझ्यासाठी आश्चर्यकारक होते की पॅनेलने माझ्या उत्तराकडे फारसे लक्ष दिले नाही आणि ते म्हणाले, मी माझा प्रश्न बदलतो.

त्यानंतर त्यांनी विचारले होते की, तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून चांगल्या पदावर काम करत आहात, तर मग तुम्ही नागरी सेवेत येण्याचा निर्णय कसा घेतला? योगेश म्हणाले, जेव्हा त्यांनी आपला प्रश्न बदलला तेव्हा मी देखील माझे उत्तर बदलले होते. योगेश म्हणाले, यूपीएससीच्या मुलाखतीत आपल्याला कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील हे कुणालाही माहित नसते, परंतु पॅनेलला कोणत्याही उमेदवारामध्ये हे पहायचे असते की, तणाव असल्यास आपल्या स्वभावात काही बदल होऊन आपल्यावर दबाव जाणवतो की मग आपण परिस्थितीला आपल्या नियंत्रणात ठेवतो.