US : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे धाकटे बंधू रॉबर्ट यांचं निधन

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे धाकटे बंधू रॉबर्ट ट्रम्प यांचे शनिवारी रात्री न्यूयॉर्कच्या एका हॉस्पीटलमध्ये निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. रॉबर्टसुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणे बिझनसमॅन होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी एक वक्तव्य जारी करत आपल्या भावाचे निधन झाल्याची माहिती दिली. शुक्रवारी रॉबर्ट ट्रम्प यांना भेटण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हॉस्पीटलमध्ये गेले होते.

रॉबर्ट ट्रम्प यांची प्रकृती गंभीर होती. ट्रम्प यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले, मला अतिशय दु:ख होत आहे की, माझे लाडके बंधू रॉबर्ट यांनी आज या जगाचा निरोप घेतला. रॉबर्ट केवळ माझे भाऊ नव्हते, तर सर्वात चांगले मित्र होते. मी त्यांना खूप मिस करेन. परंतु आम्ही पुन्हा भेटू. माझ्या हृदयात त्यांची आठवण नेहमी राहील.

रॉबर्ट ट्रम्प आपले राष्ट्राध्यक्ष भाऊ डोनाल्ड ट्रम्प यांच्या अतिशय जवळ होते आणि प्रत्येक संकटात त्यांच्या सोबत उभे राहात होते. त्यांना यापूर्वी सुद्धा अनेक वेळा आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. रॉबर्ट आणि डोनाल्ड ट्रम्प दोघेही बिझनेसमॅन आहेत, पण दोघांचा स्वभाव खुप वेगळा होता. स्वता डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते की, त्यांचा छोटा भाऊ त्यांच्यापेक्षा खुप शांत आणि समजूतदार आहे. ट्रम्प त्यांना प्रेमाने हनी बोलत असत. ट्रम्प त्यांच्या भावाच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे.