‘कोरोना’वरील लसीबाबत जगाला मदत नाही करणार : अमेरिका

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोना लसीसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर संघटितपणे जे प्रयत्न सुरु आहेत, त्यात सहभागी होणार नाही असे ट्रम्प प्रशासनाने जाहीर केले आहे. लस विकसित करण्यासाठी आणि वितरणासाठी आंतरराष्ट्रीय समुदायासोबत काम करणार नाही अशी ट्रम्प प्रशासनाची भूमिका आहे. अशा प्रकल्पात काम करताना जागतिक आरोग्य संघटनांसारख्या संस्थांमुळे काही गोष्टी कराव्याच लागतील. इच्छेविरुद्ध अशा गोष्टी करणे मान्य नसल्यामुळे अमेरिकेने आंतरराष्ट्रीय समुदायासोबत काम करण्यास नकार दिला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणानुसार, ‘जागतिक आरोग्य संघटना चीनच्या प्रभावाखाली असून त्याठिकाणी मोठया प्रमाणावर सुधारणांची आवश्यकता आहे’. कोरोनावरील लस विकसित करण्याच्या प्रकल्पात 150 पेक्षा जास्त देश सहभागी असून हा गट डब्ल्यूएचओशी जोडलेला आहे. विविध देशांची सरकारे लस उत्पादक कंपन्यांसोबत व्यक्तीगत पातळीवर करार करत आहेत. त्यांना सुद्धा ‘कोव्हॅक्स’मध्ये सहभागी होण्याचा फायदा होईल. लस उत्पादक कंपनीसोबत एखाद्या देशाचा करार यशस्वी होऊ शकला नाही, तरी ‘कोव्हॅक्स’च्या माध्यमातून त्या देशाला ती लस मिळू शकते. कोरोना संकट अद्यापही टळले नसताना सध्या सर्वांचे लक्ष कोरोनाची लस कधी उपलब्ध होईल याकडे लागले आहे. यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाची लस वैद्यकीय चाचणीच्या तिसर्‍या टप्प्यात पोहोचली असून चाचणी पूर्ण होण्याच्या अगदी जवळ पोहोचली असल्याचे सांगितले आहे.