पॅकेज जाहीर केल्यानंतर विजय मल्ल्यानं केलं अभिनंदन, म्हणाला – ‘सरकार इच्छा असेल तर आवश्यक तितक्या नोटा छापू शकतं’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे भारतासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. या संकटातून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. उदयोजकांकडून पॅकेजचे स्वागत करण्यात आले आहे. त्यानंतर आता सार्वजनिक बँकांचे कर्ज बुडवून भारतातून फरार झालेल्या विजय मल्ल्यानंही सरकारचे पॅकेजबद्दल अभिनंदन केले आहे.

केंद्र सरकारने लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला. याचबरोबर आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा करत 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज भारताला संकटातून उठून झेप घेण्यासाठी मदत करेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला होता. दरम्यान, भारतातील सार्वजनिक बँकांचे कर्ज बुडवून फरार झालेल्या उद्योगपती विजय मल्ल्याने पॅकेजचे स्वागत करण्याचबरोबर मोदी सरकारचे अभिनंदन केले आहे. सरकार इच्छा असेल तर आवश्यक तितक्या नोटा छापू शकते.

पण, सार्वजनिक बँकांचे 100 टक्के कर्ज परत करण्याची ऑफर देणार्‍या माझ्यासारख्या छोट्या मदत करू इच्छिणार्‍याकडे सतत दुर्लक्ष केले पाहिजे का? माझी विनंती आहे की, कोणत्याही शर्थींशिवाय पैसे घ्या आणि हे संपवा, असे विजय मल्ल्या यांनी ट्विट केले आहे. विजय मल्ल्या गेल्या काही वर्षांपासून पूर्ण कर्जाची परतफेड करण्याची तयारी दर्शवित आहे. यापूर्वीही जेट एअरवेजसमोर आर्थिक संकट उभे राहिल्यानंतर त्याला पुन्हा उभारी देण्यासाठी सरकारने सर्व बँकांना हाक दिली होती. त्यावेळी मल्ल्या यांनी पैसे घेण्याची विनंती केली होती. ते जेट एअरवेजला वाचवू शकतात, अशी विनंती मल्ल्याने दिली होती.