धक्कादायक ! तामिळ सिनेस्टार ‘विजय’च्या मुलीला बलात्काराची धमकी, मुरलीधरनच्या बायोपिकमध्ये करणार होता काम

चेन्नई : वृत्तसंस्था –   तामिळ सिनेस्टार विजय सेतुपतीने क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधनरच्या जीवनावर आधारित ‘800’ या सिनेमातून माघार घेतली आहे. विविध स्तरांतून येणाऱ्या दबावामुळे त्याला हा निर्णय घ्यावा लागला. एवढंच नाही तर एका ट्रोलरने सोशल मीडिया वरुन विजय सेतुपतीला, तुझ्या मुलीवर बलात्कार करु अशी धमकी दिली आहे. तुझ्या मुलीवर बलात्कार केल्यानंतर तुला तामिळ लोकांचं दु:ख समजेल, अशी आक्षेपार्ह भाषा ट्विटमध्ये वापरली होती. अशा पद्धतीच्या कमेंटसाठी अनेक नेटीझन्सनी त्या ट्रोलरला चांगलेच फैलावर घेतले.

विजय सेतुपतीला अशा पद्धतीची धमकी देणाऱ्या त्या ट्विटचा गायिका चिन्मयी श्रीपदाने निषेध केला असून, तिने चेन्नई पोलिसांना ते ट्विट टॅग केले आहे. अशा प्रकारे बलात्काराची धमकी देणं, हा गुन्हा आहे. हे कोणी बदलू शकत नाही का ? असा सवाल चिन्मयीने तिच्या ट्विटरच्या माध्यमातून विचारला आहे. नुकतेच भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला एका ट्रोलनरे मुलीवर बलात्कार करण्याची धमकी दिली होती. या ट्रोलरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

काय आहे प्रकरण ?

श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथ्थया मुरलीधनरच्या आयुष्यावरील 800 या बायोपिकमधून दक्षिणेतील अभिनेता विजय सेतुपती याने माघार घेतली होती. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या मुथ्थया मुरलीधरनच्या जीवनावर आधारीत या चित्रपटामध्ये विजय सेतुपती मुख्य भूमिका साकारणार होता. मात्र, निर्मात्यांनी चित्रपटाची घोषणा केल्यानंतर सोशल मीडियावर या चित्रपटाला जोरदार विरोध सुरु झाला. त्यामुळे विजयला या चित्रपटातून माघार घ्यावी लागली. मुरलीधरननं लिहलेलं एक पत्र ट्विट करत विजय सेतुपतीने या चित्रपटाला रामराम ठोकला आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला होता.