लोकसभा 2019 : सांगलीतून विशाल पाटील मैदानात ; ‘या’ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी आघा-डीच्या वतीने विशाल पाटील यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. विशाल पाटील हे स्वाभिमानीच्या चिन्हावर महाआघाडीचे उमेदवार असतील. विशाल पाटील हे 2 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून सांगलीच्या उमेदवारीबाबत घोळ सुरु होता तो आता अखेर संपला आहे.

दरम्यान, सांगलीची जागा काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडली होती. परंतु विशाल पाटील यांनी सांगलीची जागा लढवण्याचा निर्धार केला होता. काँग्रेस पक्षाकडून अन्यथा अपक्ष विशाल पाटील ही जागा लढणार होते. यावर रात्री उशीरा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि खासदार राजू शेट्टी यांची चर्चा झाली. यावेळी विशाल पाटील यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला.

दुसरीकडे गोपीचंद पडळकर यांनीही ही निवडणूक कोणत्याही स्थितीत लढणारच असा निर्धार केला होता. या निवडणुकीसाठी ते तयारीलाही लागले होते. परंतु आता विशाल पाटील हे मैदानात उतरल्यानंतर गोपीचंद पडळकर यांचा निर्णय काय असणार याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे.

सांगलीचे मैदान आता रंजक होणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. कारण सर्वात आधी भाजपाकडून विद्यमान खासदार संजय पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनीही ही निवडणूक लढवण्याचा इरादा व्यक्त केला आहे.