vizag gas tragedy : पुन्हा एकदा लिक झाला ‘विषारी’ गॅस, गुजरातहून पोहचलं PTBC केमिकल, हेल्पलाईन नंबर जारी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमच्या एलजी पॉलिमर इंडस्ट्रीमध्ये पुन्हा एकदा गॅस गळती झाली आहे. रात्री उशिरा फॅक्टरीतून पुन्हा एकदा विषारी गॅस बाहेर पडला, त्यानंतर एनडीआरएफच्या पथकाने आजूबाजूचे गाव रिकामे करण्यास सुरवात केली. गॅस गळतीची बातमी मिळताच गुजरातमधून पीटीबीसी केमिकल मागविण्यात आले आहे. एअर इंडियाच्या विशेष कार्गो विमानातून केमिकल मागविण्यात आले. त्याद्वारे गॅस निष्क्रिय करण्याचे काम केले जात आहे.

विशाखापट्टणममधील या कारखान्यात पुन्हा एकदा गॅस गळतीस प्रारंभ झाला आहे. ज्या टँकरमधून गळतीमुळे अपघात झाला, त्याच टँकरमधून पुन्हा एकदा गॅस गळतीस सुरुवात झाली. आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी आजूबाजूची गावे त्वरित रिकामी केली आहेत. गॅस निष्प्रभावी करण्यासाठी पीटीबीसी (पॅरा-तृतीयक बुटाइल कॅटेचोल) गुजरातहून आणण्यात आले आहे. त्याच्या मदतीने, विषारी वायूचे परिणाम दूर करण्याचे काम चालू आहे. अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या मदतीने ही कारवाई सुरू आहे.

ताज्या माहितीनुसार, अग्निशामक यंत्रणेची आणखी 10 इंजिन घटनास्थळी पोहोचली आहेत. त्यामध्ये 2 फोम टेंडरच्या गाड्या सुद्धा आहेत. आंध्र प्रदेश पोलिसांनीही एक हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. या हेल्पलाइन नंबरवर कॉल करून, लोक मदत आणि माहिती विचारू शकतात. गुरुवारी घडलेल्या या घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला.