वाल्ह्यात विद्यार्थ्यांनी केली पत्र लिहून मतदार जागृती

महर्षी वाल्मिकी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राबविला अभिनव उपक्रम

पुरंदर : पोलीसनामा आँनलाईन – देशातील मतदारांमध्ये गेल्या काही निवडणुकांपासून वाढत चाललेला निरुत्साह आणि त्यामुळे कमी होत असलेली मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध प्रयत्न केले जात आहेत. त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणुन आगामी लोकसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या पार्श्वभुमीवर पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथील रयत शिक्षण संस्थेच्या महर्षि वाल्मिकी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एक अभिनव उपक्रम राबविला. त्यांनी आई-वडीलांसह नातेवाईकांना पत्र लिहुन मतदानासाठी भावनिक साद घातली.

पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथील महर्षि वाल्मिकी विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानवाढीसाठी शाळेमध्ये एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये विद्यालयातील पाचवी ते नववी पर्यंतच्या पाचशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. पत्राच्या माध्यमातुन त्यांनी आपले आई-वडिलांसह नातेवाईकांना आगामी २३ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी मतदान केंद्रावर जावून मतदान करण्याची भावनिक साद घातली. हे पत्र प्रत्येकाच्या नावे एक असुन, त्यांना स्वहस्ते विद्यार्थी देणार आहेत. विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या या अनोख्या उपक्रमाद्वारे परिसरातील मतदानाची टक्केवारी वाढण्यास निश्चित वाढ होण्यास मदत होणार असल्याचा, विश्वास विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केला.

दरम्यान, पत्रामध्ये विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाने दिलेल्या मतदानाच्या अमूल्य अधिकाराचा वापर करुन भारतीय लोकशाही सदृढ करण्यासाठी व आमच्या उज्वल भविष्यासाठी आपल्या मताधिकाराचा न चुकता वापर करावा, अशी भावनिक साद घातली आहे. लोकशाही परंपरेचे जतन करण्यासाठी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या २३ एप्रिल रोजी नि:पक्षपातीपणे व निर्भयपणे, कोणत्याही प्रभावाला बळी न पडता आपण मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे अशी विनंती देखील विद्यार्थ्यांनी पत्राद्वारे केली आहे.

या अनोख्या उपक्रमासाठी संजीवनी गंभीर, आम्रपाली गडवे, सुप्रिया खताळ, अंकिता ठाकूर, वैशाली भामे, संगिता रासकर, पी.बी.जगताप, ए.बी.दरेकर, ए.डी.भोसले, हरिश्चंद्र भालिंगे आदिंनी सहकार्य केले. विद्यालयातील सहशिक्षक विशांत ठाकूर यांनी सुत्रसंचालन केले. तर विद्यालयाचे पर्यवेक्षक बाबासाहेब कुंभार यांनी आभार मानले.