Cyclone Amphan Live Tracking : ‘ताकदवान’ होतंय चक्रीवादळ ‘अम्फान’, 200 KMPH वर पोहोचला वेग, ‘हाय अलर्ट’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सुपर सायक्लोन अम्फान आज पश्चिम बंगालच्या किनार्‍यावर आदळण्याची शक्यता आहे. यावेळी 155 ते 185 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील आणि मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागानुसार बंगालच्या किनार्‍यावरील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल आणि समुद्रात चार ते पाच मीटर उंचीच्या लाटा उसळतील. हवामान विभागाच्या माहितीनुसार हे चक्रीवादळ उत्तर आणि उत्तर पश्चिम दिशेला खुप वेगाने पुढे सरकत आहे. अंदाज आहे की, याचा वेग आणखी वाढू शकतो. सायक्लोन अम्फान आज दुपारपर्यंत पश्चिम बंगालच्या दीघा आणि बांग्लादेशच्या हादियामध्ये धडकू शकते. वादळाचा धोका पाहून ओडीशामध्ये 1704 कॅम्प तयार करण्यात आले आहेत. सोबतच 1,19,075 लोकांना किनार्‍याच्या परिसरापासून दूर नेण्यात आले आहे.

ओडिशाच्या समुद्रात हालचाल 
हवामान विभागाच्या माहितीनुसार चक्रीवादळाचा वेग खुप वाढू शकतो. चक्रीवादळ अम्फान आपल्या केंद्रात 200 किलोमीटर प्रति तास वेगाने पुढे सरकत आहे. कॅम्पसह ओडिशामध्ये 2000पेक्षा जास्त घरे तयार आहेत, ज्यामध्ये गरज भासल्यास किनार्‍यावरील लोकांना ठेवले जाऊ शकते. तत्पूर्वी येथील मच्छिमार आणि समुद्र किनारी राहणार्‍या लोकांना हलविण्यात आले आहे. ओडिशात पहाटे सुमारे 4:30 वाजता काही भागात 82 किमी प्रति तास वेगाने वारे वाहत होते. येथील किनार्‍याच्या परिसरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. राज्य सरकारचे अधिकारी स्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तसेच एनडीआरएफच्या अनेक टीम तैनात करण्यात आल्या आहेत. ओडिशाच्या भद्रकमध्ये वेगवान वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे. हवामान विभागाचा अंदाज आहे की, दुपारी सुमारे 2:30 वाजता चक्रीवादळ ओडिशाच्या किनार्‍यावर आदळू शकते.

बालासोरच्या चांदीपुरमध्ये वेगाने वारे वाहत आहेत. किनार्‍यावर हालचाली दिसू लागल्या आहेत. अम्फान ओडिशासह किनार्‍यालगतच्या 8 राज्यामध्ये विध्वंस करू शकते. यासाठी बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, केरळ, तमिलनाडुमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. ओडिशाचे मुख्यमंत्री म्हणाले, वादळामुळे एकाही व्यक्तीचा जीव जाणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

तर, सुपर सायक्लोन अम्फानचा परिणाम मान्सूनवरही पडू शकतो. हवामान विभागाचे म्हणणे आहे की, मान्सून येण्यास काहीसा उशीर होऊ शकतो. यापूर्वी मान्सून 1 जूनपर्यंत येण्याची शक्यता होती. परंतु, आता अम्फान सायक्लोनमुळे त्यास आणखी काही दिवस लागू शकतात. तसेच केरळमध्ये सुद्धा मान्सून उशीराने पोहचण्याची शक्यता आहे. केरळमध्ये यावेळी मान्सून 5 जूनपर्यंत येऊ शकतो. मागील वर्षी अंदमान-निकोबारमध्ये दोन दिवस आधी म्हणजे 18 मेरोजी आला होता. परंतु, गती कमी झाल्याने केरळात उशीराने पोहोचला होता. तर संपूर्ण देशात मान्सूनची सुरूवात 19 जुलैला झाली होती. हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा मान्सून सामान्य राहील.