राजवाड्यासारखा लग्नाचा मंडप कोसळून 7 वऱ्हाडी जखमी

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – राजवाड्यासारखा लग्नाचा मंडप अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे कोसळून त्यात ७ वऱ्हाडी जखमी झाल्याची घटना यवतमाळ येथे गुरुवारी घडली. सुदैवाने लग्न समारंभातील बहुतेक वऱ्हाडी हे परतले असल्याने रात्री उशिरा साडेदहा वाजता मंडप कोसळला. ही घटना अगोदर घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता.

येथील व्यापारी अजय शेटे यांच्या मुलीचा गुरुवारी जांब रोड येथील एम. डब्ल्यु. पॅलेसमध्ये विवाह समारंभ आयोजित करण्यात आला होता. या बिग बजेट लग्नासाठी मोठा राजवाड्यासारखा लग्न मंडप उभारला होता. गेल्या काही दिवसांपासून त्याचे काम सुरु होते. त्यामुळे शहरात एकच चर्चेचा विषय झाला होता.

या लग्नाला मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी झाली होती. रात्री लग्न समारंभाची गर्दी ओसरत होती. जोरदार वारे वहात होते. अशावेळी अचानक लोखंडी मंडप कोसळला. त्या खाली दबून ७ ते ८ वऱ्हाडी मंडळी जखमी झाले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. त्यात अचानक जोराचा अवकाळी पाऊस सुरु झाला. त्यामुळे या गोंधळात आणखीनच भर पडली. जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.