‘दोन वेगळ्या पक्षाचे मोठे राजकीय नेते चहा-बिस्कीटावर तर नक्कीच बोलणार नाहीत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांच्या भेटीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केलं आहे. त्यांच्या वक्तव्यामुळं फडणवीस-राऊत भेटीचं गूढ आणखी वाढलं आहे. दोन वेगवेगळ्या पक्षाचे मोठे राजकीय नेते चहा-बिस्कीटावर तर नक्कीच बोलणार नाहीत असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. मुंबईत पत्रकारांसोबत ते बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “दोन वेगवेगळ्या पक्षांचे मोठे नेते एकमेकांना भेटत असतील, दोन-अडीच तास बोलत असतील तर चहा-बिस्कीटावर नक्कीच बोलणार नाहीत. त्यात राजकीय चर्चा होणारच.” असंही ते म्हणाले आहेत.

राज्यात वेगळी राजकीय समीकरणं जुळण्याची शक्यताही त्यांनी बोलून दाखवली. कोरोनामुळं सध्या संकटाची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत कुणालाही निवडणुका नको आहोत. यावर अन्य पर्यायही समोर येऊ शकतो असं सूचक विधान त्यांनी केलं आहे. यापुढं भाजप राज्यातील सर्व निवडणुका स्वबळावर लढेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत आणि भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात काल झालेल्या गुप्त भेटीमुळं महाराष्ट्राच्या राजकारणात खळबल उडाली आहे. एकमेकांवर घणाघाती टीका करणारे 2 नेते अचानक गुप्तपणे भेटल्यानं अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या भेटीत सामनातील मुलाखतीची चर्चा झाली असल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे.

संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात 2 तास बैठक झाली. सांताक्रूझच्या ग्रँड हयातमध्ये ही बैठक झाली. या भेटीमुळं भविष्यात भाजप आणि शिवसेना एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

काय म्हणाले संजय राऊत

काल झालेल्या भेटीवर बोलताना संजय राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची ती भेट गुप्त नव्हती. शिवसेनेत गुप्त बैठका वगैरे होत नाहीत. मुलाखतीबाबत ती भेट होती. त्याचे वेगळे अर्थ काढण्याची गरज नाही. राजकारणात आम्ही वैयक्तिक शत्रुत्व मानत नाही” असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. या भेटीबाबत उद्धव ठाकरे यांना कल्पना होती असा दावाही त्यांनी केला आहे.