शिवसेनेकडे खडसेंना देण्यासाठी आहे तरी काय ? चंद्रकांत पाटलांची उद्धव ठाकरेंवर ‘बोचरी’ टीका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मागील काही दिवसांपासून भाजपाचे नाराज असलेले नेते म्हणजेच, एकनाथ खडसे हे शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा होती. परंतु या चर्चेचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खंडन केले आहे. ते म्हणाले की, केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि माझ्याशी एकनाथ खडसेंची भेट झाली असून आम्ही त्यांची नाराजी दूर केली आहे. त्यामुळे खडसे शिवसेनेत जाण्याच्या वृत्ताला काहीही अर्थ नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान आज जळगावमध्ये एकनाथ खडसे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री गिरीष महाजन यांची भेट झाली. परंतु या भेटीत कोणत्याही प्रकारची नाराजीबाबत चर्चा झाली नाही असे खडसेंनी सांगितले.

आज चंद्रकांत पाटील पुण्यामध्ये होते यावेळी त्यांना खडसेंच्या शिवसेना प्रवेशाबाबत प्रश्न करण्यात आला. तेव्हा ते म्हणाले की, शिवसेनेकडे खडसेंना देण्यासाठी आहे तरी काय, कोल्हापूरमध्ये शिवसेना विरोधकांना जाऊन मिळली आहे त्यामुळे भाजपाला अपयश आले. आम्हाला हरवण्यासाठी सर्वांना एकत्र यावे लागले. सोलापूर, सांगलीत आम्ही आलो हे लक्षात असू द्यावे, अशी बोचरी टीका चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर केली आहे.

तसेच चंद्रकांत पाटील म्हणाले की, सरकारने सत्तेपोटी नीतीमुल्ये सोडली आहेत त्यांना जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणे घेणे नाही. उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्री झाले. इतर नेत्यांचे त्यांना काही पडलेले नाही. पक्षातील दिग्गज नेते म्हणजेच दिवाकर रावते, गोगावले, जाधव यांना डावलण्यात आल्याचा आरोप पाटील यांनी केला. तसेच विधानसभा अध्यक्षाची निवडणूक आजही गुप्त मतदानाद्वारे घेऊन दाखवावी असे आव्हान चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला केले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/