कोण आहेत बुरख्यात ‘शाहीन बाग’मध्ये पोहचणार्‍या गुंजा कपूर, ज्यांना PM मोदी देखील करतात फॉलो, जाणून घ्या

नवी दिल्ली : बुधवारी शाहीन बागमध्ये बुरख्यात सापडलेल्या हिंदू महिलेवरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. बुरख्यात शाहीन बागमध्ये पोहचलेल्या या महिलेचे नाव गुंजा कपूर आहे. यु-ट्यूबवर आपला चॅनल चालवणार्‍या गुंजा कपूरला पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटरवर फॉलो करतात. जाणून घेवूयात कोण आहे गुंजा कपूर, जिच्या नावाची एवढी चर्चा होत आहे…

गुंजा कपूर राईट नॅरेटीव्ह नावाचा यु-ट्यूब चॅनल चालवते. आपल्या या चॅनलवर तिने काल शाहीन बागचा एक व्हिडिओ सुद्धा चालवला होता. तिने शाहीन बाग आंदोलनात येणार्‍या एका महिलेच्या मुलाच्या मृत्यूवर हा पूर्ण व्हिडिओ बनवला होता.

तिने व्हिडिओमध्ये शाहीन बाग आंदोलनाच्या दरम्यान थंडीमुळे मुलाचा मृत्यू झाल्याचे आणि आईच्या बेपर्वाईमुळे हा मृत्यू झाल्याचे म्हटले होते. तिच्या एका व्हिडिओला सोशल मीडियावर चांगली प्रसिद्धी मिळाली होती.

गुंजा कपूर मुळची लखनऊची राहणारी आहे. तिने लखनऊच्या ला मार्टिनियर स्कूलमध्ये शिक्षण पूर्ण केले आहे. यु-ट्यूबमध्ये तिच्या चॅनलचे 5000 सदस्य आहेत. तर ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा तिला फॉलो करतात.

ट्विटरवर गुंजा कपूरचे 22 हजारपेक्षा जास्त फॉलोअर आहेत. तर फेसबुकवर तिला 2000 पेक्षा जास्त लोक तिला फॉलो करतात. गुंजा कपूर सोशल मीडियामध्ये दक्षिणपंथी विचारधारेची यूजर्स म्हणून ओळखली जाते.

दिल्लीच्या शाहीन बागमध्ये सीएएविरूद्ध आंदोलन सुरू आहे. बुधवारी आंदोनाच्या ठिकाणी एक संशयास्पद महिलेला बुरखा घालून व्हिडिओ बनवताना तेथील महिलांनी पकडले होते.

बुरखा घातलेली ही महिला बुधवारी आंदोलनकर्त्या महिलांमध्ये बसून त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारत होती. तेव्हा काही महिलांना संशय आला आणि तिची झडती घेतली असता तिच्याकडे कॅमेरा मिळाला. यावरून मोठा गोंधळ उडाला. सोशल मीडिया आणि विविध स्त्रोतांनुसार महिलेची ओळख गुंजा कपूर म्हणून सांगितली जात आहे.

सोशल मीडियावर गुंजा कपूरने तिच्या बद्दल दिलेल्या महितीनुसार ती एक यु-ट्यूब क्यूरेटर आहे. याशिवाय एक विश्लेषक, लेखिका आहे. तिला उडीया आणि मराठी भाषेचे ज्ञान आहे. सध्या सोशल मीडियावर तिच्या नावाची सतत चर्चा सुरू आहे.