चव्हाण विदेशात शिकून आले, आता या प्रश्नाचं उत्तर द्या, शिक्षणमंत्र्यांचा क्लास

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत असे वक्तव्य केले होते. त्यावरून शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना आव्हान दिले आहे. आता चव्हाण यांनी पुढील पंतप्रधान कोण होणार ? हे घोषित करावे असे तावडे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान म्हंटले आहे.

याबाबत बोलताना तावडे म्हणाले, ‘पृथ्वीराज चव्हाण खूप हुशार आहेत, ते विदेशात शिकून आले आहेत. नरेंद्र मोदी जर पंतप्रधान होणार नाहीत. हा तुमचा राजकीय अभ्यास असेल तर मग कोण पंतप्रधान होणार हे त्यांनी जाहीर करावं.’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथील जाहीर सभेत शरद पवार यांच्यावर टीका करत त्यांच्या मर्मावरच घाव घातला आहे.

सुळेंनी विनाकारण चिडचिड करू नये
वर्धा येथील सभेदरम्यान बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार कुटुंबियांबाबत भाष्य केले होते. त्यावरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती. विनोद तावडे यांनी या प्रकरणावरून सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे. यावेळी बोलताना तावडे म्हणाले, ‘पंतप्रधान मोदी यांची टीका बहुधा सुप्रिया सुळे यांना रुचली नाही. त्यामुळेच त्यांनी मोदीजी यांना कुटुंबाचा अनुभव नाही असं वक्तव्य केलं. पण नरेंद्र मोदी यांना एक भाऊ आहे. त्यांच्या भावाला मुलं आहेत. त्यांच्या भावाशी आणि त्यांच्या मुलांशी कुटुंबातील वागणूक कशी आहे. हे दिसतं. पण पवारांच्या कुटुंबातील वास्तव नरेंद्र मोदी यांनी समोर आणल्यानंतर ते स्वीकारण्यापेक्षा विनाकारण चिडचिड करू नये’ असा टोलाही तावडे यांनी सुप्रिया सुळेंना मारला.