Coronavirus Lockdown : ‘लॉकडाऊन’मध्ये प्रवासी मजुरांच्या ट्रेनच्या तिकीटांचे पैसे कोण देणार ? रेल्वेनं सांगितलं ‘असं’ काही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ३ मे रोजी संपणाऱ्या लॉकडाऊनचा कालावधी आता १७ मेपर्यंत वाढवला आहे. यादरम्यान, भारतीय रेल्वेने गेल्या शुक्रवारपासून देशातील विविध भागात अडकलेल्या प्रवासी कामगार, विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी विशेष गाड्या सोडण्यास परवानगी दिली आहे. देशाच्या निवडक मार्गांवर गाड्या चालवल्या जात आहेत.

ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी कोणालाही तिकीट दिले जात नाहीये. म्हणजेच अडकलेल्या लोकांकडून तिकिटांचे पैसे घेतले जात नाहीयेत. या शिवाय ट्रेनमध्ये खाण्यापिण्याच्या वस्तू देखील मोफत दिल्या जात आहेत. अशा परिस्थितीत रेल्वेकडून केल्या जाणाऱ्या या खर्चाचे पैसे कोण देणार, हा प्रश्न आहे. त्याला उत्तर देताना रेल्वेने संबंधित राज्य सरकारांकडून भाडे आकारले जाईल, असे म्हटले आहे.

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, भाड्यामध्ये स्लीपर क्लासच्या तिकिटाची किंमत, ३० रुपये सुपरफास्ट शुल्क आणि प्रति प्रवाशांच्या भोजनाशिवाय पाण्यासाठी २० रुपये समाविष्ट असतील. राज्य सरकारे त्यासाठी पैसे देणार आहेत.

रेल्वेमध्ये फक्त १००० ते १२०० प्रवाशांनाच बसण्याची परवानगी असल्याचे रेल्वेने स्पष्टपणे सांगितले आहे. रेल्वेकडून गाड्यांमध्ये सोशल डिस्टंसिंग आणि सॅनिटायझेशनची पूर्ण काळजी घेतली जाईल. मात्र, कोणती लोक ट्रेनने प्रवास करू शकतात, हे राज्य सरकार ठरवणार आहे.

२५ मार्च रोजी लॉकडाऊन लागू झाल्यापासून देशातील विविध ठिकाणी हजारो प्रवासी अडकलेले होते. बर्‍याच जणांनी शेकडो किलोमीटर अंतरावर पायी जाण्याचा प्रयत्न देखील केला.