…. म्हणून सुजितसिंह ठाकुरांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाची संधी ‘हुकली’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपच्या अंतर्गत राजकारणामुळे भाजपचे नेते सुजितसिंह ठाकूर यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची संधी हुकली आहे अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. सुजितसिंह ठाकूर हे दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत तयार झालेले नेते आहेत. गेल्या 5 वर्षात ठाकूर भाजपचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून पुढे आले आहेत. ठाकूर मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील आहेत, जो बीडच्या शेजारी आहे.

गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर मेळावा घेत आपली भूमिका स्पष्ट केली होती. यावेळी त्यांनी राज्यातील पक्ष नेतृत्वाला आव्हान दिलं होतं. यावेळी या मेळाव्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि इतर अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती.

या मेळाव्याला सुजितसिंह ठाकूर यांनीही हजेरी लावली होती. ही उपस्थिती ठाकुरांना भोवली असे बोलले जात आहे. राजकीय वर्तुळात तशी चर्चा सुरू आहे. कारण विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी सुजितसिंह ठाकूर यांचं नाव आघाडीवर होतं. परंतु एका रात्रीत त्यांचं नाव रद्द झालं आणि मनसेतून भाजपमध्ये आलेल्या प्रविण दरेकर यांना विरोधी पक्षनेतेपदासाठी संधी मिळाली.

राणा जगजितसिंह यांच्या भाजप प्रवेशावेळी सुजितसिंहांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभवली होती. इतकेच नाही तर देवेंद्र फडणवीसांच्या ते फारच विश्वासातील मानले जात होते. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदासाठी त्यांच्या नावाची खूप चर्चा होती.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/