पैसे न दिल्याने पत्नीने पतीला धु-धु धुतले ; पत्नीवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गावी जाण्यासाठी पैसे मागितले असता न दिल्याने म्हणून पत्नी आणि भावजयने मिळून पतीला धु धु धुतले. त्याच्या डोक्यात फरशीचे पोळपाट घालून जखमी केले. ही घटना चिंचवडमधील विद्यानगर बसस्टॉपजवळील घरात गुरुवारी पहाटे साडेचार वाजता घडली.

याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी निता नवनाथ तोरणे (वय २६) आणि अनिता संतोष तोरणे (वय २७) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी नवनाथ सोपान तोरणे (वय ३४) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, निता ही नवनाथची पत्नी आहे. तर अनिता ही त्याची भावजय आहे. निता हिने गावी जाण्यासाठी नवनाथकडे पैसे मागितले. तेव्हा नवनाथ याने आपल्याकडे पैसे नाहीत असे सांगितले. यावरुन संतप्त झालेल्या निता हिने पतीला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. त्याच्या डोक्यात घरातील फरशीचे पोळपाट घातले. अनिता हिनेही शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तसेच नवनाथ याच्या डाव्या ओठा शेजारी व हाताच्या अंगठ्याला चावा घेऊन जखमी केले.