AB डिव्हिलियर्स T-20 वर्ल्ड कप खेळणार ? द. आफ्रिकेच्या कर्णधारानं ‘हे’ सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या क्रिकेट क्षेत्रात खेळाडू हे निवृत्ती घोषित करतात आणि काही दिवसांनी पुन्हा निवृत्तीचा निर्णय मागे घेतात. हा एकप्रकारे ट्रेंडच होत चाललाय. असाच निर्णय आता वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो यानं घेतला आहे. आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्यासाठी तयार असल्याचं सांगून काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जाहीर केलेल्या निवृत्तीचा निर्णय त्याने मागे घेत यू टर्न मारला. नंतर आता दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सनेही ऑस्ट्रेलियात होणारा वर्ल्ड कप खेळावा अशी इच्छा व्यक्त केली जात आहे. आता एबी डिव्हिलियर्सनेही निवृत्तीच्या निर्णयाचा फेरविचार करावा असा सूर दक्षिण आफ्रिका संघातून उमटताना दिसत आहे.

एबी डिव्हिलियर्सनं गेल्या वर्षी मे महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्याने २०१९ च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर निवृत्तीचा निर्णय मागे घेत निवडीसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले होते. पण, निवड समितीनं त्याची निवड केली नाही. पण, आता ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या निमित्तानं पुन्हा डिव्हिलियर्सची चर्चा सुरू झाली आहे. या संदर्भात फॅफ ड्यू प्लेसिस याने एक महत्वाचं विधान केले आहे, ”एबीनं वर्ल्ड कप खेळावा अशी लोकांची इच्छा आहे आणि माझ्याही मनातही तेच आहे. त्यासाठी गेल्या दोन व तीन महिने त्याच्याशी चर्चा सुरू आहे. त्यातून काय निकाल लागतो, हे लवकरच कळेल.” त्यामुळे एबी डिव्हिलियर्स पुन्हा मैदानात उतरणार असून प्रेक्षकांचा उत्साह अजून वाढणार आहे.

दरम्यान दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक आणि माजी खेळाडू मार्क बाउचर यांनी गेल्या आठवड्यात डिव्हिलियर्सच्या निवृत्तीबाबत मत व्यक्त केलं होतं की,”वर्ल्ड कप स्पर्धेला सामोरे जाताना संघाकडे सर्वोत्तम खेळाडू असणे आवश्यक असते. आणि एबी मला आमचा सर्वोत्तम खेळाडू वाटतो त्यामुळे तो संघात असल्याने संघाचाच फायदा आहे, तर मग त्याच्याशी मी चर्चा का करू नये?” असे मार्क बाउचर यांनी सांगितले.

दक्षिण आफ्रिकेचा संघ पुढच्या वर्षी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून यांच्याविरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे. त्यानंतर काही दिवसांनी वेस्ट इंडिज आणि श्रीलंका दौरा होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. परंतु या मालिकेमध्ये डिव्हिलियर्सची खेळण्याची शक्यता कमीच आहे. कारण, या दरम्यानच्या काळात आयपीएलच्या स्पर्धा रंगणार आहेत. डिव्हिलियर्सने नुकत्याच पार पडलेल्या MSL लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत डिव्हिलियर्सनं (३२५) तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं ४६.४२ च्या सरासरीनं या धावा केल्या आहेत आणि त्यात चार अर्धशतकांचा समावेश आहे. एबी डिव्हिलियर्सनं आपला फॉर्म कायम ठेवला असून त्याने घेतलेल्या निवृत्तीच्या निर्णयावर पुन्हा यू टर्न घेण्याची वेळ जवळ आली असे चिन्ह दिसत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/