पुढच्या 25 वर्षांचा करार करुन सत्तेत येणार, दसरा मेळाव्यात संजय राऊतांचा एल्गार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे (shivsena) सरकार जे देशभरात ठाकरे सरकार म्हणून ओळखले जाते, ते पाच वर्षे पूर्ण करणार असल्याचे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी सांगितले. तसेच पुढल्या पाच वर्षांनी सत्तेत येणारच आणि त्यापुढील 25 वर्षाचा जनतेसोबत करार (contract) करुन सत्तेत राहणार असल्याची घोषणा संजय राऊत यांनी केली आहे.

यावेळी त्यांनी दिल्लीतील भाजपच्या नेत्यांना फटकारलं. फलाना नेते दिल्लीतून सांगतात महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी मुंबईत 200 कोटी रुपये पाठवले आहेत. अरे मुंबईसाठी 200 कोटी रुपये हा फार कमी आकडा आहे. तुम्हाला शोभतील असे 2000 कोटी, 5000 कोटी असे आकडे सांगा. 200 कोटी हा तुमच्यासाठी महापालिकेचा आकडा झाला. कोणीही कितीही कारस्थाने केली, तरीही ठाकरे सरकार राहणार आहे, असे राऊत म्हणाले. आमच्या मागे 11 कोटी जनतेचा आशिर्वाद असल्याचे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र दिल्लीचे तख्त राखणार
संजय राऊत पुढे म्हणाले, आता यापुढे सारे महा होणार आहे. हा महाविजयादशमी सोहळा आहे. आगामी काळात महाराष्ट्र दिल्लीचेही तख्त राखणार असल्याचे राऊत यांनी म्हटले. एक वर्ष होऊन गेले, जेव्हा मुख्यमंत्री शिवसेनेचा म्हणालो, त्याच दिवशी शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला होता, असे सांगत त्यांनी सेनापती बापट यांच्या ओळी ऐकविल्या. थोड्याच दिवसांत कळेल की देशाचे नेतृत्व महाराष्ट्रच करणार आहे, ते कोण करणार हे आम्हाला माहित आहे, असेही संजय राऊत म्हणाले.