पुन्हा लॉकडाउन होणार ?, ठाकरे सरकारच्या मंत्र्यांनी दिले महत्त्वाचे संकेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सरकार आणि आरोग्य व्यवस्थेची चिंता वाढली आहे. दिवाळीत अनेक ठिकाणी गर्दी दिसून आली. त्याचा परिणाम आता दिसू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे मुंबईत लॉकडाउन होणार का, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. याबाबत मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार (vijay-wadettiwar) यांनी लॉकडाउनबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत.

वडेट्टीवार म्हणाले, मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे. त्यामुळे मुंबईत बाहेरून येणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. परराज्यांमधून मुंबईत लोंढे येतात. सध्याचा घडीला देशातील अनेक भागांमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मुंबईतील परिस्थिती बिघडू नये, यासाठी निर्बंध लादले गेले पाहिजेत, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. तसेच मुंबई, पुणे, नागपूर आणि काही शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पुढील 8 दिवसांत परिस्थिती पाहून निर्णय घ्यावे लागतील. पुढील काही दिवस दर दिवशी किती रुग्ण आढळून येतात, त्याचा आढावा घेतला जाईल. मागच्या वेळेसारखी परिस्थिती निर्माण झाल्यास त्याप्रमाणे निर्णय घ्यावे लागतील, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. यावेळी त्यांनी थेट लॉकडाउनचा उल्लेख केलेला नसला, तरी मागील परिस्थितीप्रमाणे निर्णय घ्यावे लागतील, असे म्हणत रेल्वे, विमान सेवा बंद करण्याचा उल्लेख केला आहे.

मुख्यमंत्री लॉकडाउनबद्दल काय म्हणाले?

पुन्हा लॉकडाउनच्या दिशेने जायचे नसेल तर तर वेळीच सावध व्हा, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या जनतेशी संवाद साधताना खबरदारीचा इशाराच दिला. कोरोनाची लस अजून आलेली नाही. त्यामुळे कोरोना संपला असे समजू नका. गर्दी वाढली की कोरोना वाढणार. त्यामुळे उगाच विषाची परीक्षा घेऊ नका. अनेक जण मास्क वापरत नाहीत. काही ठिकाणी विनाकारण गर्दी होताना दिसत आहे. ही ढिलाई परवडणारी नाही, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले होते. गेल्या अनेक महिन्यांपासून जनतेकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. ‘गेल्या आठ महिन्यांत अनेक सण येऊन गेले. मात्र, आपण ते अतिशय साधेपणानं साजरे केले. गर्दी टाळली. त्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा कमी झाला. जनतेकडून मिळालेल्या या सहकार्याला तोड नाही. त्याबद्दल मी जनतेचा आभारी आहे. यापुढेही सर्वांकडून अशाच प्रकारच्या सहकार्याची आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.