अवैध दारूची विक्री करणार्‍यांवर कारवाई, वाईन शॉप सील करण्यास सुरूवात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा सोडून सर्व दुकान बंद ठेवण्यात आली. मात्र, या काळात राज्यातली आर्थिक स्थिती ढासळली. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारनं मद्यविक्रीची दुकानं सुरु केली. पण दुकानांबाहेरची गर्दी पाहिल्यावर सरकारने दारूची ऑनलाइन विक्री सुरु केली. पण ठाण्यात ऑनलाइन दारू घरपोच विक्री करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करताना घोडबंदर रोडवरील एका वाईन शॉपच्या मॅनेजरसह दोन कामगार मंगळवारी सकाळी अवैद्यरित्या दारू विक्री करताना कासारवडवली पोलिसांना सापडले. त्यांच्याकडून पोलिसांनी ५७ बाटल्यासंह रोख रक्कम असा सुमारे १४ हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, घोडबंदर रोडवरील कासारवडवली नाका येथे अनमोल वाईन शॉपचे कामगार रॉबिनसन डिसोजा (वय २३) अविनाश सिंग (वय २३) हे दोघे त्या वाईन शॉपचे मॅनेजर सुदिपब्रिज नारायण सिंग यांच्या संगनमताने ऑनलाइन दारू विक्री न करता अवैद्यरित्या दारू विक्री करत असल्याची पोलिसांना मिळाली. त्यानुसार, कासारवडवली पोलिसांनी सापळा रचून त्यांना पकडलं. त्यांच्याकडून विविध कंपनीच्या ५७ बाटल्या आणि रोख २३०० रुपये असा १३ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तर, त्या तिघांनाविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (ई) सह कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अद्याप त्यांना अटक केली नसून, त्यांना नोटीस बजावण्यात येणार आहे. तसेच याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहिती देण्यात आली असून त्यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देत, ते वाईन शॉप सील करण्याची प्रक्रिया सुरु केल्याची माहिती कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी दिली.