रस्त्यावरील पाण्यातून वाहत होता विद्युत प्रवाह, झटका लागताच महिलेचा झाला मृत्यू

वसई : पोलीसनामा ऑनलाइन – वसईत महावितरण विभागाच्या दुर्लक्षतेमुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. जोत्स्ना आल्पेश परमार (वय-28) असे महिलेचे नाव असून महावितरनाच्या कारभाराची शिक्षा महिलेला आपला जीव देऊन भोगावी लागली आहे.

वसईत राहणाऱ्या जोत्स्ना या रविवारी दळण टाकण्यासाठी चालल्या होत्या. परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला होता आणि त्यातच रस्त्यावर मोठया प्रमाणावर पाणी साचले होते. परिसरात विद्युत पुरवठा करणाऱ्या भूमिगत केबल खराब झाल्याने विद्युत प्रवाह थेट रस्त्यावरील पाण्यात उतरला होता. जोत्स्ना  यांना विजेचा जोरदार धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

जोत्स्ना परमार या मुळगाव येथे आपल्या कुटूंबासोबत राहता होत्या त्यांच्या कुटूंबात पती आणि दोन लहान मुली आहेत. स्थानिक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मूळच्या राजस्थानच्या रहिवाशी असलेल्या जोत्स्ना यांना महावितरणाच्या गलथानपणामुळे आपला जीव गमवावा लागल्याने महावितरणाच्या कारभार प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात असून लोकांच्या मनात महावितरणाविषयी प्रचंड रोष असल्याचे दिसून आले.