विवाहीत प्रियकरासोबत राहण्यासाठी महिला कॉन्स्टेबलची ‘बनवाबनवी’, पत्नीकडून पर्दाफाश

आजमगड : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशातील आजमगड येथे एका महिला पोलिस कॉन्स्टेबलने विवाहित प्रियकरासोबत राहण्यासाठी, पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये फेरबदल करत तिची बदली प्रियकराच्या जिल्ह्यात करुन घेतल्याचं एक सनसनाटी प्रकरण समोर आलं आहे. याबाबतची माहिती पुरुष हवालदाराच्या पत्नीला मिळताच तिने बुधवारी सायंकाळी एसपी कार्यालय गाठलं. पोलिस पत्नीने दिलेल्या माहितीनुसार एसपींनी या प्रकरणाची चौकशी केली. त्यामधून अनेक सत्य समोर आले. सदरील प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षकांनी महिला कॉन्स्टेबलविरोधात विभागीय कारवाईची शिफारस केली. तर पुरुष हवलदाराची कोतवाली येथून पवई पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बलिया जिल्ह्यात राहणार हवालदार सध्या कोतवाली शहरात कार्यरत होता. या हवालदाराचे पोलिस ठाण्यात काम करणाऱ्या महिला कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध सुरु होते. दरम्यान, या प्रकरणाची माहिती पत्नीला मिळाल्यानंतर तिने बुधवारी आपल्या माहेरातून थेट आजमगड येथील एसपी. प्रो. त्रिवेणी सिंह यांच्याकडे गेल्या. त्यांना सुरु असलेल्या सर्व प्रकरणाची हकीकत सांगितली. त्यानंतर कोतवाली येथे काही तास चौकशी सुरु होती. आरोपांची पुष्टी झाल्यानंतर एसपींनी पत्नीच्या तक्रारीवरून तिच्या पती हवलदाराची बदली पवई पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली. तसेच तातडीने त्याला पोलिस ठाण्यात हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या.

तर महिला कॉन्स्टेबल डीआयजीशी संलग्न असल्यामुळे डीआयजीला पत्र लिहून तिच्याविरोधात विभागीय कार्यवाहीची शिफारस केली आहे. ही महिला कॉन्स्टेबल गाझीपूर जिल्ह्यातील रहिवाशी असून, तिने स्वतःच्या जिल्ह्याचा पुरावा लपवत चुकीच्या पद्धतीने शेजारच्या जिल्ह्यात स्वतः ची बदली केली होती. महिला कॉन्स्टेबलवरती विभागीय कारवाई केल्यानंतर डीआयजीला दुसऱ्या जिल्ह्यात बदली करण्याचे पत्रही पाठविण्यात आल्याची माहिती एसपी. प्रो. त्रिवेणी यांनी दिली.