‘फ्री काश्मीर’ पोस्टरवरुन ‘वादंग’, शिवसेनेचे भाजपला ‘उत्तर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्लीतील जेएनयूत विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया येथे करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनादरम्यान एका आंदोलक तरुणीने ‘फ्री काश्मीर’चे पोस्टर झळकवल्याने मोठे वादळ उठले, त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यावर स्पष्ट मत मांडले आहे.

संजय राऊत म्हणाले की ‘फ्री काश्मीर’ या फलकाबाबत प्रसिद्ध झालेल्या काही बातम्यांचा संदर्भ देत या पोस्टरचा वेगळा अर्थ काढू नये. केंद्राकडून जम्मू काश्मीरमध्ये अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. तेथे इंटरनेट, एसएमएस, मोबाइल सेवा बंद करण्यात आल्या आहेत. या पोस्टर झळकवण्यामागे भावना होती की या निर्बंधातून काश्मीर मुक्त करावे. तसेच काश्मीरला भारतापासून वेगळे करण्याची भाषा कोणी करणार असेल तर ते खपवून घेणार नाही असेही संजय राऊतांनी स्पष्ट केले.

जेएनयूतील भ्याड हल्ल्यावर बोलताना राऊतांनी तीव्र प्रतिक्रिया मांडली. रात्रीच्या आंधारात चेहरे झाकून चोर, दहशतवादी आणि दरोडेखोर हल्ले करत असतात. गेट वे ऑफ इंडिया येथील आंदोलकांवर कोणत्याही प्रकारे पोलीसी बळाचा वापर करण्यात आला नसून आंदोलनाची जागा बदलण्याचे सोपस्कार पोलिसांनी केला.

भाजपने केली कारवाईची मागणी –
‘फ्री काश्मीर’च्या पोस्टरवरुन देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांनी जोरदार आक्षेप घेतला होता. फडणवीसांनी सवाल केले की मुंबईत नेमके कशासाठी आंदोलन सुरु आहे? ‘फ्री काश्मीर’च्या घोषणा का दिल्या जातयेत? फुटीरतावादी प्रवृत्तींना मुंबईत का थारा दिला जात आहे? मुख्यमंत्री कार्यालयापासून दोन किलोमीटर अंतरावर सुरु असलेले हे देशविरोधी आंदोलन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का?. तसेच फडणवीस यांनी कारवाईची मागणी केली आहे.

चंद्रकांत पाटील तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी ट्विट केले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात काश्मीरला वेगळे करणारे बॅनर झळकावण्याच्या घटनेचा तीव्र निषेध असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असते, तर त्यांनी अशा प्रवृत्तींना ठेचले असते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी लक्ष घालून, याची सखोल चौकशी करावी आणि अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई करावी. सत्तेच्या लालसेपोटी मौन बाळगू नये असे आवाहन देखील चंद्रकांत पाटलांनी केले.

आव्हाडांविरोधात किरीट सोमय्या पोलीसात –
गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलकांकडून स्वतंत्र काश्मीरच्या घोषणा देण्यात आल्या. या आंदोलात जितेंद्र आव्हाड सहभागी झाले होते या कारणाने त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी भाजप नेते किरिट सोमय्या यांनी केली. कुलाबा पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे अशी माहिती सोमय्या यांनी ट्विट करत दिली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/