‘कोरोना’ प्रतिबंधासाठी केलेली कामे व निधीच्या गोळा बेरजेचे काम सुरू; अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांचे सर्व विभागप्रमुखांना आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर मार्च महिन्यापासून कोरोना प्रतिबंधासाठी केलेली कामे व निविदांची माहिती महापालिकेच्या सर्व विभागप्रमुखांकडून मागविण्यात आली आहे. १७ नोव्हेंबरपर्यंत ही माहिती सादर करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिले आहेत.

मार्चमध्ये शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. पाठोपाठ देशभरात रुग्णसंख्या वाढू लागल्याने १८ मार्चपासून राज्य सरकारने अनेक व्यवहारांवर निर्बंध आणायला सुरुवात केली, तर २५ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाउन जाहीर केले. दरम्यान, मार्चच्या पहिल्या आठवड्यात २०२०-२१ च्या स्थायी समितीच्या अंदाजपत्रकाला सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाली. कोरोनाचे संकट लक्षात आल्याने पाठोपाठ स्थायी समितीने कोरोनाशी संबंधित उपचार व अन्य सुविधा तातडीने निर्माण करण्यात तांत्रिक अडचणी येऊ नयेत, यासाठी सर्व आर्थिक अधिकार आयुक्तांना दिले. यामुळे पुणे देशपातळीवर रेड झोनमध्ये होते तरी आरोग्य यंत्रणा गतीने निर्माण करण्यात यश आले आहे.

ऑक्टोबरपासून शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने घटत आहे. कोरोना ड्यूटीसाठी अन्य विभागात नेमलेल्या कर्मचार्‍यांना पुन्हा मूळ खात्यात रुजू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे मार्चपासून जवळपास सात महिने ठप्प झालेले अन्य विभागांचे कामकाज पुन्हा सुरू होत आहे. नगरसेवकांकडूनही विकासकामांना प्रामुख्याने रखडलेल्या छोट्या प्रकल्पांच्या कामांना गती देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. कोरोना प्रतिबंधासाठी महापालिकेला मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागला असून, उत्पन्न मात्र घटले आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने कोरोना प्रतिबंधासाठी केलेल्या कामांचा, तसेच निविदांचा एकत्रित हिशेब करण्यासाठी पावले उचलली आहेत. याचा उपयोग कोरोनाची दुसरी लाट आल्यास कराव्या लागणार्‍या उपाययोजना, उर्वरित अत्यावश्यक कामे; तसेच कोरोना काळात केलेला खर्च वजा जाता उर्वरित रकमेतून करावे लागणारे पुढील चार महिन्यांचे नियोजन करणे शक्य होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.