‘तुम्ही करून दाखवलंत’ ! अमृता फडणवीसांनी पती देवेंद्र आणि अजित पवारांना दिल्या ‘शुभेच्छा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज सकाळी (शनिवार, दि. 23 नोव्हेंबर) भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर आता फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अमृता फडणवीस यांनी ट्विट करत पती देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्विटमध्ये अमृता फडणवीस म्हणतात, “Congratulations Shri @Dev_Fadnavis & Shri @AjitPawarSpeaks ! You have done it !” तुम्ही करून दाखवलंत असं अमृता फडणवीसांनी म्हटलं आहे.

दरम्यान आज सकाळी अचानक फडणवीस आणि अजित पवारांचा शपथविधी पार पडला. सर्वांसाठी ही एक आश्चर्याची बाब होती. काल रात्री पर्यंत महाविकासआघाडीचं सरकार येणार हे जवळपास निश्चित झालं होतं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार यावरही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस अशा तिन्ही पक्षांची सहमती झाली होती. परंतु अचानक आज फडणवीस आणि पवारांनी शपथ घेतली. ही घटना म्हणजे एक राजकीय भूकंप होता. आज अचानक नवीन राजकीय समीकरण राज्यात उदयास येताना दिसलं.

काय होती अजित पवारांची प्रतिक्रिया ?
दरम्यान शपथविधीनंतर एएनआयसोबत बोलताना अजित पवार म्हणाले की, “कोणत्याही पक्षाला राज्यात सत्तास्थापनेचा दावा करता आला नाही. नको त्या गोष्टींची मागणी वाढत होती. राज्याला स्थिर सरकार हवं होतं. तीन पक्ष एकत्र येण्यापेक्षा दोन पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करणं गरजेचं होतं. तीन पक्ष एकत्र येणं कठीण वाटत होतं. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार यावं यासाठी रस्ता काढण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला.”

Visit : Policenama.com