’देशाचे नेतृत्व करण्याची आपल्यात क्षमता’, संजय राऊतांनी दिल्या उद्धव ठाकरेंना अनोख्या शुभेच्छा

पोलिसनामा ऑनलाईन टीम – ये दोस्ती…हम नही तोडेंगे… आपण आमच्या आयुष्यात खास आहात’ ’देशाचे नेतृत्व करण्याची आपल्यात क्षमता आहे असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने सकाळपासून राजकीय शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

संजय राऊत यांनी ट्वीट करून उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. ’देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता आपल्यात आहे’ असे उद्गगारही त्यांनी काढले आहे. देशाचे नेतृत्व करण्याचे वक्तव्य केल्यामुळे राजकीय नेत्यांनी भुवय्या उंचावल्या आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल पंतप्रधानपदाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यात आता राऊतांनी शुभेच्छा देताना हे विधान केले आहे.

’फक्त सहा महिन्यांच्या काळात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून नुसते लोकप्रिय ठरले नाहीत तर देशात अव्वल नंबर पटकावून पुढे आले. गंभीर विषयाचा, शत्रूचा अभ्यास करायचा व मगच घाव घालायचा या पक्क्या तयारीनेच ते मैदानात उतरतात. त्यामुळे त्यांच्या विरोधात उभे ठाकलेले सर्व राजकीय विषाणू उडून धुळीतून वाहत गेले. उद्धव ठाकरे यांना कुटुंबाची महान परंपरा लाभली आहे. त्या परंपरेचा वारसा हा राजकीय तितकाच प्रबोधनाचा आहे, सामाजिक परिवर्तनाचा आहे. सह्याद्रीच्या टोकदार अभेद्य कडयाप्रमाणे त्यांचे नेतृत्व आज देशाचे शक्तिस्थान ठरले आहे. सह्याद्रीच्या कडयाने आता हिमालयाचे नेतृत्व करण्यासाठी पुढची चाल करावी. ‘साठी’ ही सुरुवात आहे, मोठ्या राजकारणाचा आरंभ आहे. महाराष्ट्र आपल्या पाठीशी आहे. ’ असे सामनामध्ये म्हटले आहे.