इन्स्टाग्रामवर तरुणींची बदनामी करणारा अटकेत

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – इन्स्टाग्रामवर मैत्री केल्यानंतर मैत्रिणींचे मोबाईल क्रमांक देण्यास तरुणीने नकार दिल्यास त्यांचे फोटो घेऊन कॉल गर्ल अशी कमेंट टाकून तिची बदनामी करणाऱ्या तरुणाला सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. इन्स्टाग्रामवरील माहिती लपून राहात नाही . त्यामुळे अशा प्रकारे कोणी फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्यास तरुणींनी न घाबरता पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन सायबर गुन्हे शाखेने केले आहे.

रवी कुमार पासवान (मुळ रा. रोहतास, बिहार) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याला अटक करून सिंहगड रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , महाविद्यालयीन तरुणींना बनावट इन्स्टाग्राम खात्याद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत होता . त्यानंतर त्यांनी फ्रेन्ड रिक्वेस्ट स्विकारल्यावर त्याना फ्रेंड लिस्टमध्ये असेलेल्या मैत्रिणींचे मोबाईल क्रमांक मागून त्यांच्याशी व्हाट्सअप द्वारे चॅटींग करत होता . तिने मोबाईल क्रमांक देण्यास नकार दिल्यावर तिचे फोटो घेऊन त्यावरून माहितीच्या आधारे तिचे बनावट इन्स्टाग्राम खाते तयार करत होता . त्या खात्यावर कॉल गर्ल अशी कमेंट पोस्ट करीत होता . त्यामुळे तरुणींना फोन येऊन त्यांना त्रास दिला जात होता . अशा प्रकारे कोथरुड व डेक्कन परिसरात राहणाऱ्या तरुणींची बदनामी करण्यात आली होती .  त्यामुळे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती .

त्यानंतर सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण औटे यांनी तपास करून रवी पासवान याला कागल कोल्हापूर येथून ताब्यात घेतले . त्याला सिंहगड रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे . त्याच्याकडून आणखी १० ते १२ गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता आहे.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त संभाजी कदम , सहायक पोलीस आयुक्त निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे , पोलीस उपनिरीक्षक किरण औटे , मंदा नेवसे , कर्मचारी शिरीष गावडे , आदेश चलवादी , माधूरी डोके , ज्योती दिवाणे यांच्या पथकाने केली.