‘गोर-गरिबां’पर्यंत औषधं ‘फ्री’मध्ये पोहचवण्यासाठी बंगालच्या 11 वर्षीय युवराजनं बनवलं App, अशी करणार मदत

कोलकाता : वृत्त संस्था  – पश्चिम बंगालमधील कोलाकाताच्या 11 वर्षांच्या एका मुलाने असे अ‍ॅप तयार केले आहे, जे गरीब रूग्णांपर्यंत किमती आणि जीवदान देणारी औषधे सहज पोहचवू शकेल. या अ‍ॅपद्वारे गरजूंना मोफत औषधे पुरवता येतील. अ‍ॅडटेक स्टार्टअप व्हाईट हॅट ज्यूनियरने युवराज शहा नावाच्या मुलाच्या या अ‍ॅपला मंजूरी दिली आहे. हे अ‍ॅप आल्यानंतर ऐनवेळी औषध न मिळण्याची समस्या दूर होऊ शकते.

11 वर्षांच्या युवराज शहाने बनवले मेडमेज अ‍ॅप
युवराज शहाने आपल्या अ‍ॅपचे नाव मेडमेज ठेवले आहे. याद्वारे लोक उपचाराच्या दरम्यान शिल्लक आणि विना एक्सपायर औषधे सरकारी हॉस्पिटल्सना दान करू शकतात. युवराजचे म्हणणे आहे की, जे लोक सरकारी आरोग्य योजनांतर्गत येतात आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये न मिळाल्यास खासगी मेडिकल्समधून खरेदी करणे शक्य नसते अशा लोकांसाठी हे अ‍ॅप उपयोगी पडू शकते.

गरजूंना मोफत औषधे
आपल्या अ‍ॅपबाबत सांगताना युवराजने सांगितले की, एकवेळ लॉगइन केल्यानंतर मेडमेज अ‍ॅप युजरला औषधांची नावे, त्यांची एक्सपायरी डेट, उपलब्ध स्ट्रिप्सची संख्या इत्यादी माहिती देण्यात परवानगी देते. हॉस्पिटल औषधांची माहिती पाहण्यासाठी अ‍ॅप उघडेल आणि औषधे दान करणार्‍यांशी संपर्क साधून औषधे प्राप्त करेल. अशा पद्धतीने हे अ‍ॅप औषधांची नासाडी कमी करणे आणि ती गरजूंना उपलब्ध करून देण्यास मदत करेल.

अशी सुचली कल्पना
युवराजने सांगितले, एक दिवस मी पाहिले की, आवश्यक तेवढे औषध घेतल्यानंतर आजोबांची प्रकृती ठिक झाली, आणि त्यांच्यासाठी खरेदी करण्यात आलेली खुप औषधे शिल्लक राहिली. शिवाय एक्सपायरी डेट शिल्लक असूनही ती फेकण्यात आली. तेव्हा मला वाटले की, अशी अनेक औषधे लोकांकडे शिल्लक राहात असतील, जी गरीबांना उपयोगी पडू शकतात. हा विचार करूनच हे अ‍ॅप बनवण्याचा निर्णय घेतला.