Coronavirus : ‘कोरोना’ विरूध्दच्या लढाईसाठी युवराज सिंहची 50 लाखांची मदत

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी जगभरातील लोकांकडून मदतीचा ओघ सुरु आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकार्‍यांच्या अथक परिश्रमामुळे काही लोक करोनातून बरे झाले आहेत. सध्याच्या घडीला भारतासह संपूर्ण जग कोरोना विषाणूविरोधात लढत आहे. दरम्यान, आफ्रिदीच्या संस्थेला मदत करा असे आवाहन केल्यामुळे गेले काही दिवस टीकेचा धनी ठरत असलेला युवराज सध्या एका सकारात्मक गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. त्याने कोरोनाच्या लढ्यासाठी 50 लाखांची मदत जाहीर केली आहे.

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या प्रचंड वाढत आहे. राज्यात देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशा स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लढाईचा सामना करण्यासाठी आर्थिक मदतीसाठी पीएम केयर निधीत आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे. त्यास उत्तम प्रतिसाद मिळत असून अनेक कलाकार, व्यापारी मंडळी, उद्योगपती, क्रीडापटू, संस्था आणि सर्वसाधारण जनता करोनावर मात करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. यात आता युवराजचीही भर पडली आहे. युवराजने ट्विट करून 50 लाखांची मदत पंतप्रधान सहाय्यता निधीला देण्याचे वचन दिले आहे.