पुण्यात वरुणराजाचा ‘महाकोप’ – प्रलयामुळे 10 जणांचा मृत्यु, शाळांना सुट्टी जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बुधवारी रात्री पावणेनऊ वाजता सुरु झालेल्या मुसळधार पावसाने दक्षिण पुण्यात एकच हाहाकार उडवून दिला असून अरण्येश्वर येथील टांगेवाले कॉलनीतील १० जणांचा मृत्यु झाला आहे. त्यातील ५ जणांचे मृतदेह मिळाले असून आणखी काही ठिकाणी लोक वाहून गेल्याची माहिती आहे. या पावसाने किती प्रचंड नुकसान झाले, याची भीषणता आज सकाळी दिसून आली.

अरण्येश्वर परिसरात भिंत कोसळून ५ जणांचा मृत्यु

कात्रज परिसरात बुधवारी रात्री दोन तासात प्रचंड जोरात पाऊस झाल्याने कात्रज तलाव भरुन वाहू लागला होता. त्यामुळे अंबिल ओढ्याला मोठ्या प्रमाणावर पूर आला आहे. या पाण्यामुळे अरण्येश्वर परिसरातील टांगेवाला कॉलनीची भिंत कोसळली. भिंत अंगावर पडून त्यात काही जणांचा मृत्यु झाला तर तर काही जण प्रवाहासोबत वाहून गेले. आतापर्यंत ५ जणांचे मृतदेह सापडले असून तावरे कॉलनीत एक मृतदेह सकाळी वाहून आल्याचे आढळून आले आहे. रोहित भरत आमले (वय १३), संतोष कदम (वय ५५), सौं सौंदलीकर (वय ३२) आणि त्यांचा ९ वर्षांचा मुलगा यांचा मृत्यु झाला आहे.

वानवडीत वाहून गेलेल्या मोटारीत एकाचा मृतदेह आढळला –

आंबील ओढ्याला आलेल्या पुरामुळे दत्तवाडी, दांडेकर पुल झोपडपट्टीतील असंख्य झोपड्यांमध्ये पाणी शिरले होते. रस्त्यांवर इतके पाणी होते की, अग्निशमन दलाचे जवान, पोलीस यांना तेथे जाणे अशक्य होत होते. वस्तीतील लोकच एकमेकांना मदत करुन सुरक्षितस्थळी जाण्याचा प्रयत्न करीत होते. वानवडी येथे एक मोटार वाहून गेली होती. त्यात एकाचा मृतदेह आढळून आला आहे.

असंख्य दुचाकी, मोटारी पुरात गेल्या वाहून –

सहकारनगर भागात असलेल्या एका गोठ्यात पाणी शिरल्याने तेथील किमान १० म्हशी वाहून गेल्या. त्यात विविध ठिकाणी रस्त्यावर मरुन पडलेल्या आज सकाळी आढळून आले आहे. कात्रज येथील राजस चौकात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. येथील पुलाखाली उभ्या केलेल्या ५० हून अधिक मोटारी व दुचाकी वाहून गेल्याचे सांगण्यात येत आहे.

५ तालुक्यात अतिवृष्टी, शाळांना आज सुट्टी –

५ तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने शाळांना आज सुट्टी देण्यात आली आहे. नवीन कात्रज बोगद्यात दरड कोसळल्याने पुणे ते सातारा महामार्ग बंद पडला होता. वरुन धो धो पाऊस पडत असताना हजारो लोक रस्त्यावर अडकून वाहनांच्या तीन ते चार किमी रांगा लागल्या होत्या.

वारजे, कोथरुड , सिंहगड रोड परिसरातील असंख्य सोसायटीत पाणी शिरले होते. सहकारनगर, तावरे कॉलनीतील बंगल्यांच्या परिसरात पाणी शिरले होते. आता सकाळी हे पाणी ओसरल्यावर या बंगल्यांमध्ये माती मोठ्या प्रमाणावर वाहून आल्याने चिखल झालेला दिसून येत आहे. गुजरवाडी फाटा येथे एक ट्रकचालक वाहून गेल्याची भिती व्यक्त केली जात आहे. पण, त्या भागात अद्याप कोणीही मदतीला गेले नव्हते.

Image

Visit : policenama.com