Coronavirus : देशात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 62064 नवे पॉझिटिव्ह तर 1007 जणांचा मृत्यू

पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. देशात आतापर्यंत २२ लाखांपेक्षा अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितल्यानुसार, गेल्या चोवीस तासांत ६२ हजार ६४ नवे कोरोना रुग्ण नोंदवण्यात आले. तर १००७ जणांचा मृत्यू झाला. एका दिवसात एक हजारांहून अधिक मृत्यू झाल्याने देशाची चिंता वाढली आहे.

देशातील एकूण रुग्णांची संख्या २२ लाख १५ हजार ७५ इतकी झाली आहे. दिलासादायक बातमी अशी की उपचार सुरु असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. सध्या देशात ६,३४,९४५ रुग्णांवर देशातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर १५ लाख ३५ हजार ७४४ रुग्णांना उपचारानंतर सोडून देण्यात आला आहे. देशात ४४ हजार २८६ कोरोना संसर्गित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. तसेच दिल्ली, तामिळनाडू, गुजरात,राजस्थान आणि मध्यप्रदेश सारख्या राज्यात सुद्धा कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. आयसीएमआरनं सांगितल्यानुसार, ९ ऑगस्ट रोजी चार लाख ७७ हजार २३ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत २ कोटी ४५ लाख ८३ हजार ५५८ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. चाचण्यांचे प्रमाण वाढल्याने देशातील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे.