‘पक्षांतर’ केलेल्या ‘या’ 19 जणांना दाखवले मतदारांनी ‘आस्मान’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील तब्बल ३५ नेत्यांनी आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना आणि भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्या सर्वांना या दोन्ही पक्षाने उमेदवारी दिली. मात्र, त्यापैकी तब्बल १९ जणांना मतदारांनी घरचा रस्ता दाखविला आहे.

राज्यभरात महायुतीची लाट असल्याचा दावा करीत जवळपास सर्व प्रसिद्धी माध्यमांना हाताशी धरुन विरोधक कोठेच नसल्याचे चित्र राज्यात गेल्या सहा महिन्यांपासून तयार केले गेले होते. त्याचबरोबर विरोधकांना सीबीआय, ईडीची धमकी देऊन त्यांच्यावर दबाव असण्यात येत होता. त्यामुळे आपले राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी त्यांनी भाजपा आणि शिवसेनेत उड्या घेतल्या. पण त्यापैकी १९ जणांचा पक्षांतराचा निर्णय मतदारांना पटला नाही. मतदारांनी त्यांना नाकारले. त्यात शिवसेनेच्या ११ आणि भाजपाच्या ९ जणांचा समावेश आहे.

भाजपाने सर्वात प्रतिष्ठेची केलेली सातारा लोकसभेच्या जागेवर छत्रपती उदयनराजे भोसले यांचा दारुण पराभव झाला. त्यांचा पराभव केला तेही राजकारणातून जवळपास निवृत्ती स्वीकारलेल्या श्रीनिवास पाटील यांनी. आघाडीत आपल्याला तिकीट मिळू शकणार नाही, असे वाटल्याने माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाची कास धरली होती. भाजपालाही तेथे उमेदवार नव्हता. पण इंदापूरमधून राष्ट्रवादीचे दत्ता भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव करीत तुमची सद्दी संपली असल्याचा इशारा दिला आहे.

भाजपाला सर्वात मोठा धक्का देणारा निकाल ठरला तो अकोले मतदारसंघात. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात आलेल्या वैभव पिचड यांचा पराभव झाला. त्यांचे वडिल मधुकरराव पिचड हे अनेक वर्षे आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. आदिवासीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात आपण म्हणू ती पूर्व हे आता राहिलेले नाही, हे मतदारांनी पितापुत्रांना दाखवून दिले.

बारामतीमध्ये नेहमीच भाजपा बाहेरुन उमेदवार आयात करत आला आहे. वंचित बहुजन आघाडीमधून भाजपामध्ये आलेल्या गोपीचंद पडळकर यांच्यावर बारामतीत आपले डिपॉझिट गमावण्याची पाळी आली.
काँग्रेसमधून आलेले गोपालदास अग्रवाल यांचा गोंदियामध्ये पराभव झाला. धैर्यशिल कदम यांचा कराड उत्तरमधून पराभव झाला. रमेश आडसकर यांचा माजलगावमधून पराभव झाला. भरत गावित यांचा नवापूर मतदारसंघातून पराभव झाला आहे.

शिवसेनेत आलेल्या ११ जणांना पराभवाची चव चाखण्याची वेळ आली. राष्ट्रवादी काॅंग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या जयदत्त क्षीरसागर यांना आपलाच पुतण्या संदीप क्षीरसागर याने आस्मान दाखविले. दिलीप सोपल यांना अपक्ष लढणाऱ्या राजेंद्र राऊत यांनी पराभव केला. काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या भाऊसाहेब कांबळे यांचा श्रीरामपूरमध्ये पराभव झाला. रश्मी बागल यांचा करमाळा मतदारसंघात पराभव झाला. संजय कोकाटे यांना माढा मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागला.

विजय पाटील यांचा वसईमध्ये पराभव झाला. दिलीप माने यांना सोलापूर मध्य मधील मतदारांनी घरी बसविले. नागनाथ क्षीरसागर यांना मोहोळमधून पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेसच्या निर्मला गावित यांना शिवसेनेने प्रवेश दिल्यापासून विरोध होत होता. इगतपूरीतून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी राजकारणात प्रवेश करुन नालासोपारामधून शिवसेनेकडून निवडणुक लढविली होती. त्यांचा पराभव झाला.

Visit : Policenama.com