संतापजनक ! बलात्कारातील संशयितांना ४०० रुपये घेऊन सोडले ; २ पोलीस निलंबित

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – महिलेचं अपहऱण करून बलात्कार केल्यानंतर पकडलेल्या संशयितांकडून प्रत्येकी ४०० रुपये घेऊन २ पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना सोडून दिल्याचा घृणास्पद प्रकार नाशिकमध्ये उघडकिस आला आहे. याप्रकरणी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. कारभारी काकुळते आणि गोरख रेहरे अशी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

पंचवटीतील कर्णनगर येथे पिडीत महिला सोमवारी रात्री दहाच्या सुमारास किराणा दुकानातून तांदूळ आणण्यासाठी जात होती. त्यावेळी संशयित कल्याण उर्फ बाळू तायडे (२४, हनुमाननगर) या रिक्षाचालकाने त्याचा मित्र दिगंबर उर्फ काळ्या विठोबा कुंदे (१९, पेठरोड) या दोघांनी महिलेला तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देऊन रिक्षात बसवले. त्यानंतर तिला मार्केट यार्डात व नंतर मखमलाबाद येथील एका नवीन बांधकाम सुरु असलेल्या इमारतीमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. महिलेच्या नातेवाईकांनी यासंदर्भात ती बेपत्ता असल्याची तक्रार पंचवटी पोलीस ठाण्यात रात्री एकच्या सुमारास केली. परंतु दोघांनी महिलेवर पहाटे ४ वाजेपर्यंत बलात्कार करून तिला कर्णनगर येथे आणून सोडले. तिची अवस्था खुपच वाईट होती. त्यानंतर महिलेने नातेवाईकांना घडला प्रकार सांगितला. दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. परंतु सहायक पोलीस निरीक्षकांनी महिला हरविल्याची तक्रार निकाली काढली आणि त्यांना घरी जाण्यास सांगितले. त्यानंतर महिलेच्या कुटुंबियांनी तिच्यावर बलात्कार झाल्याचे सांगितले. परंतु पोलिसांनी त्यांना हा तुमचा कौटुंबिक वाद आहे. घऱी जाऊन मिटवा असे सांगितले. त्यानंतर त्यांनी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. तेव्हा एका अधिकाऱ्याने पुढाकार घेऊन गुन्हा दाखल केला. या सर्व घडामोडींनंतर पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात जाऊन पिडीतेची चौकशी केली. महिला आदिवासी समाजाची असल्याने अट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पंचवटी पोलिसांनी संशयितांचा शोध घेऊन दोघांना अटक केली. तसेच रिक्षाही जप्त केला. पुढील तपास सहायक पोलीस आय़ुक्त मोहन ठाकूर करत आहेत.

दोघा बीट मार्शलने घेतले ४०० रुपये

पंचवटी पोलीस ठाण्याचे बीट मार्शल कारभारी काळकुते आणि गोरख रेहरे हे त्या रात्री मार्केट यार्ड परिसरात गेले होते. त्यावेळी दोघा संशयितांना महिलेसह त्यांनी पकडले होते. मात्र दोघांनी प्रत्येकी ४०० रुपये घेऊन दूर्लक्ष करत त्यांना सोडून दिले. याबाबत पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी स्वत: दोघांची चौकशी केली. चौकशीत त्यांनी पैसे घेऊन कर्तव्यात कसूर केल्याचे कबूल केले. त्यानंतर त्या दोघांना निलंबित करण्यात आले.