पर्यटनासाठी गेलेल्या 2 मित्रांचा बुडून दुर्दैवी मृत्यू, भंडारा जिल्ह्यातील घटना

भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन – पावसाळ्यात पर्यटनाला जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. तरुणाईमध्ये जास्त उत्साह असतो. पर्यटनस्थळावर गेल्यानंतर योग्य काळजी घेतली नाही तर ती महागात पडू शकते. परिणामी जीवावर बेतू शकते. मात्र, उत्साहाच्या भरात तरुण मुले याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. भंडारा जिल्ह्यात अशीच एक घटना घडली असून पर्यटनासाठी घराबाहेर पडलेल्या दोन मित्रांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

शिवनीबांध तलावामध्ये बुडून या दोन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नितेश धनिराम सुर्यवंशी (वय-20 रा. सौंदळ, गोंदिया) आणि अमर शामराव कुंभरे (वय-20 रा. श्रीरामनगर, गोंदिया) असे मृत्यू झालेल्या दोन मित्रांची नावे आहे. त्यांचे मृतदेह स्थानिक लोकांच्या मदतीने तलावातून बाहेर काढण्यात आले आहेत. शिवनीबंध हा दहा वर्षानंतर तुडुंब भरून वाहत असल्याने या ठिकाणी पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

मृत तरुण हे आयटीआयचे शिक्षण घेत होते. तलाव भरून वाहत असल्याने ते पर्यटनासाठी याठिकाणी आले होते. या ठिकाणी आल्यानंतर दोघांनाही पोहण्याचा मोह आवरला नाही. ते दोघे पोहण्यासाठी तलावाच्या पाण्यात उतरले. मात्र, तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तरुण पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी त्यांना पाण्याबाहेर काढले. मात्र, तोपर्यंत या दोघांचा मृत्यू झाला होता. तलाव भरला असल्याने नागरिक या ठिकाणी गर्दी करत आहेत. मात्र, या ठिकाणी प्रशासनाकडून कोणतीही यंत्रणा लावण्यात आली नसल्याने या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.