राजकीय कार्यक्रमात सहभाग घेणारे ‘ते’ २ पोलीस तडकाफडकी निलंबित

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – राजकीय कार्यक्रमात सहभाग घेतल्याप्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तोफखाना पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी दीपक रोहोकले व पोलिस मुख्यालयात नेमणुकीस असलेला त्याचा चुलत बंधू नामदेव रोहोकले ही निलंबित पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. तत्कालीन पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी केलेल्या कारवाई आदेशाची बजावणी मंगळवारी रात्री करण्यात आली आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील एका राजकीय सभेत दीपक नामदेव रोहोकले यांचा सक्रिय सहभाग आढळून आला होता. त्यावरुन चौकशी करून तत्कालीन पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना चौकशी अहवाल सादर केला होता. त्या चौकशी अहवालाच्या आधारे शर्मा यांनी दोघांनाही निलंबित केले होते. मात्र सदर आदेशाची बजावणी करण्यात आलेली नव्हती. या आदेशाची मंगळवारी रात्री उशिरा बजावणी झाली आहे.

दीपक रोहोकले हा तोफखाना पोलीस ठाण्यात ‘कलेक्टर’च्या भूमिकेत होता. तर रामदेव रोहोकले हा पोलीस मुख्यालयात नेमणुकीस होता. पोलीस मुख्यालयातील असतानाही त्याने मुख्यालयातील राखीव पोलीस निरीक्षकांची परवानगी न घेता परस्पर पारनेर तालुक्यातील राजकीय कार्यक्रमास हजेरी नोंदविली होती.

वाळू तस्करीत वाहने !

निलंबित केलेले पोलीस कर्मचारी दीपक रोहोकले व नामदेव रोहोकले या दोघांची वाहने वाळू वाहतूकीत सहभागी होती, अशी माहितीही प्राप्त झाली आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकारी रोहोकले बंधूंवर नाराज होते. वाळू तस्करीत पोलिसांची वाहने आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

You might also like