मद्यपान करुन ‘डांगडिंग’ करणाऱ्या २ पोलीसांसह ३ पोलिस तडकाफडकी निलंबित

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – दारू पिऊन ड्युटी करणाऱ्या पोलिस मुख्यालयातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांनी ही कारवाई केली.

निलंबित करण्यात आलेले पोलीस कर्मचारी साहेबराव कोरडे, बाबासाहेब शिरसाठ हे दोघे राहाता येथे निवडणूक मतदान यंत्राच्या स्ट्रॉंग रूमवर ड्युटीवर होते. दोघेही मद्यधुंद अवस्थेत ड्युटी करीत होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत दोघेही ड्युटीवर असताना दारूच्या नशेत आढळून आले. त्यामुळे याबाबतचा अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पाठवण्यात आला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांनी या दोनही पोलीस कर्मचाऱ्यांना निवडणूक कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून तडकाफडकी निलंबित केले आहे. ड्युटीवर असताना हलगर्जीपणा केल्यास कुठल्याही प्रकारची मुलाहिजा बाळगली जाणार नाही. निवडणूक काळात सर्व पोलिस कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य व्यवस्थित बसॆजवावे. अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस सूत्रांनी दिला आहे.

तो पोलीसही निलंबित!
सोनई पोलीस ठाण्यात तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेला पोलीस हवलदार विजय जॉन भिंगारदिवे याला आज निलंबित करण्यात आले आहे. त्याच्या निलंबनाचा आदेश पोलिस अधीक्षक सिंधू यांनी दुपारी काढला आहे.