राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये 400 कोटींचा गैरव्यवहार, देवेंद्र फडणवीसांकडून चौकशीची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –    केंद्र सरकारकडून प्राप्त होणाऱ्या निधीतून राज्य सरकारमार्फत राष्ट्रीय आरोग्य मिशनची (National Health Mission) अंमलबजावणी करण्यात येते. यात सेवेत कायम नियुक्त्या देण्याच्या नावाखाली सुमारे 400 कोटींचा गैरव्यवहार होत असल्याची तक्रार माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना याबाबत पत्र पाठवलं असून या गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी देखील त्यांनी केली आहे.

फडणवीसांच्या पत्रात नेमकं काय लिहिलंय ?

फडणवीसांनी सीएम ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात लिहिलंय की, “राष्ट्रीय आरोग्य मिशन ही केंद्र सरकारची योजना, केंद्राच्या निधीतून पण, राज्य सरकारच्या मार्फतच त्याची अंमलबजावणी केली जाते. त्यामुळं उमेदवारांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया ही राज्य सरकारमार्फतच होते. या योजनेत कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्यांना सेवेत कायम नियुक्त्या देण्यासंदर्भात काही विधानं मंत्र्यांकडून आल्यानंतर कायमस्वरूपी नियुक्त्यांसाठी संपूर्ण राज्यात आर्थिक देवाणघेवाणीला प्रचंड वेग आला आहे. यासंदर्भात दूरध्वनी संवादाच्या 3 ऑडिओ क्लीप देखील या पत्रासोबत जोडत आहे. या ऑडिओ क्लीपमधील संवादानुसार, समारे 20 हजार असे उमेदवार राज्यात असून, त्यांना सेवेत कायम करण्यासाठी त्यांच्याकडून 1 ते 2.50 लाख रुपये गोळा केले जात आहेत. म्हणजेच यासाठी सुमारे 300 ते 400 कोटी रुपयांचं कलेक्शन होत आहे. हे सारं कुणाच्या आशीर्वादानं होत आहे याचीही सखोल चौकशी करणं गरजेचं आहे. सेवेत कायम करण्यासाठी सुमारे 400 कोटींची उलाढाल महाराष्ट्रात होत असेल तर ते अतिशय गंभीर आहे.”

“प्रत्यक्षात उमेदवारांकडून 1 रुपयांचं सहमतीपत्र आणि 500 रुपये लढा निधी असं संकलन करत अर्जावर स्वाक्षरी घेतली जाते आणि सोबत 1 ते 2 लाख रुपयांदरम्यान रोख असलेला लिफाफा वेगळा देण्यास सांगितला जात आहे. ही रक्कम देताना नोटा या 500 आणि 2000 रुपयांच्याच असाव्यात असंही सांगितलं जात आहे. हा पैसा देण्यासाठी अनेकांनी कर्ज घेतलं आणि त्यांनी तो पैसा जमा केला. काही लोक एकमेकांना बँकेतून पैसे काढून रोख रक्कम हातात ठेवा केव्हाही भरावे लागतील असं सांगत आहेत. काही खास बँक खाती सुद्धा यासाठी उघडली गेली आहेत. हा सपूर्ण प्रकार अतिशय गंभीर असून केवळ एका अभियानात सेवेतील कायम नियुक्तीसाठी अशा पद्धतीनं 400 कोटींचा भ्रष्टाचार होत असेल तर कोरोनाच्या कालखंडात आणि तेही आरोग्य क्षेत्रात किती मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होतोय याची कल्पनाही न केलेली बरी. या ऑडिओ क्लीपची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि सरकारमधील कुणाच्या आशीर्वादानं हा प्रकार होतोय याचीही सखोल चौकशी करण्यात यावी” अशी विनंती फडणवीसांनी पत्राच्या माध्यमातून केली आहे.

You might also like