सरकारी नोकरीची इच्छा असणार्‍यांसाठी खुशखबर ! केंद्र सरकारमधील तब्बल पावणेसात लाख पदे ‘रिक्त’, भरती प्रक्रिया ‘सुरू’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी बुधवारी लोकसभेत केंद्र सरकारच्या विविध खात्यांमधील ६ लाख ८३ हजार पदे रिक्त असल्याची माहिती दिली. सोबतच केंद्र सरकारमध्ये एकूण ३८ लाख २ हजार ७७९ मंजूर पदे आहेत, ज्यामध्ये ३१ लाख १८ हजार ९५६ पदांवर अधिकारी व कर्मचारी काम करीत आहेत. निवृत्ती, राजीनामा, मृत्यू, पदोन्नती, यांमुळे ही पदे रिक्त झाल्याचे समजते, दरम्यान, ती भरण्याची प्रक्रिया संबंधित खात्यांतर्फे ठरवून दिलेल्या नियमांनुसार सुरू असते.

मागील आर्थिक वर्षात केंद्रीय लोकसेवा आयोग आणि स्टाफ सिलेक्शन बोर्ड तसेच रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड यांनी आम्हाला १ लाख ३४ हजार पदे भरण्याची शिफारस केली आहे. स्टाफ सिलेक्शन बोर्डाने १३ हजार ९९५ तर केंद्रीय लोकसेवा आयोगाने ४,३९९ पदे भरण्याची शिफारस केली आहे. त्यात रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाने सर्वाधिक १ लाख १६ हजार ३९१ पदे भरण्यात यावीत, असे सांगितले आहे. रेल्वे बोर्ड व स्टाफ सिलेक्शन बोर्ड यांच्याखेरीज पोस्टल सर्व्हिस बोर्ड आणि संरक्षण मंत्रालय यांनी ३ लाख १0 हजार ८३२ पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यात नागरी संरक्षण दलातील २७ हजार ६५२ जागाही भरण्यात येत आहेत.

दरम्यान, सर्व खात्यांना व मंत्रालयांना रिक्त पदे ठरवून दिलेल्या मुदतीत भरण्यात यावी अश्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी उमेदवारांच्या ऑनलाइन परीक्षा घेण्यात येत असून, अराजपत्रित पदांसाठीच्या मुलाखती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच तात्पुरती पदे ताबडतोब भरण्यात यावीत आणि त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी वादग्रस्त किंवा गुन्हेगारी आहेत का? हे तपासून घ्यावे, अशा सूचना दिल्याचे राज्यमंत्र्यांनी सांगितले.