Coronavirus : चिंताजनक ! मुंबईतील सायन हॉस्पीटलमधील तब्बल 99 डॉक्टरांना ‘कोरोना’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना संसर्गामुळे राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. राज्यातील सर्वात जास्त रुग्ण मुंबईमध्ये आढळून येत आहेत. त्यामुळे तेथील रुग्णालयावर मोठ्या प्रमाणात ताण आला आहे. अशातच लो. टिळक रुग्णालयातील ९२ निवासी आणि सात शिकावू डॉक्टरांना आतापर्यंत कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. तर रुग्णालयातील तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारी तसेच परिचारिका मिळून एकूण कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास एकशे नव्वदहुन अधिक असल्याचं वृत्त सूत्रांनी दिलं आहे.

यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाने सांगितलं की, उपचार घेत असलेल्या डॉक्टरांपैकी साठ जणांची प्रकृती सुधारत असून आता केवळ तीस डॉक्टरांवर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. इतर कर्मचारी, परिचारिका यांची संख्या ही एकशे नव्वदहुन अधिक असल्याचं रुग्णालय प्रशासनाने मान्य केलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून, प्रकृती सुधारण्याचे प्रमाण चांगले आहे. नायर रुग्णालय हे कोरोना रुग्णांसाठी असले तरीही रुग्णसंख्या वाढीचा ताण हा लो. टिळक रुग्णालयावर येत आहे. रुग्णालयात तीनशेहून अधिक कोरोना संसर्गित रुग्णांवरती उपचार सुरु आहे. धारावीतील रुग्णांची संख्या आता नियंत्रणात आली असली तरी इतर ठिकाणांहून येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण मात्र कमी झालेलं नाही. त्यामुळे रुग्णांकडून होणाऱ्या संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याचं निवासी डॉक्टर म्हणाले. येथे येणाऱ्या रुग्णांना उपचार नाकारले जात नाही. खाटांची उपलब्धता नसली तरी सुद्धा उपचार केले जातात. आता डॉक्टरही थकल्यामुळे नवीन टीम रुजू होण्याची आवश्यकता असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

कर्मचाऱ्याचे निधन

रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागात काम करणाऱ्या नरेश लोखंडे (वय ३५) यांचं कोरोना संसर्गामुळे निधन झालं आहे. विद्यार्थी डॉक्टरांमध्ये अतिशय प्रिय असलेले लोखंडे शस्त्रक्रिया विभागमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांना हक्काने स्वतःच्या डब्यातले जेवण खाऊ घालत. त्यांच्या निधनामुळे रुग्णालयात हळहळ व्यक्त होत आहे. दोन आठवड्यांपूर्वीच त्यांच्या वाडिलांचेही कोरोना संसर्गामुळे निधन झालं होत.

डॉक्टरांना इतरत्र राहण्याची व्यवस्था

याआधी लो. टिळक रुग्णालयातील निवासी डॉक्टर वसतिगृहाच्या एका खोलीत किमान तीन ते चार जण राहत होते. त्यामुळे दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी ड्युटीवरुन आल्यानंतर संसर्ग वाढण्याची शक्यता वाढत होती. मात्र, आता विद्यार्थ्यांची व्यवस्था इतर ठिकाणी करण्यात आली आहे. वसतिगृहातील एका खोलीमध्ये दोनपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे यापूर्वी वसतिगृहातून कोरोना संसर्गाचा प्रसार होण्याचा धोका आता नियंत्रणात आला आहे.