धक्कादायक ! ‘कोरोना’च्या अफवेनं पोलीस कॉन्स्टेबलच्या कुटुंबावर ‘बहिष्कार’

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनो व्हायरसने देशभरच नाहीतर संपूर्ण जगात थैमान घातले आहे. नागरिकांमध्ये याची दहशत निर्माण झालीय, अनेक अफवा देखील सोशल मीडियावर पसरत असतात असाच प्रकार दौंड तालुक्यातील भरतगाव या ठिकाणी घडला आहे. कर्तव्य बजावणार्‍या महिला कॉन्स्टेबलला कोरोना झालाय या अफवेने अक्षरशः तिच्या घरच्यांचे पाणी बंद करून घरावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. ही महिला कॉन्स्टेबल ही दंगल नियंत्रण पथकात सेवेत कार्यरत आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाली अशी अफवा गावामध्ये पसरली असल्याने गावातील काही नागरिकांनी अक्षरशः या कुटुंबाचे पाणी बंद केले आहे.

दौंड तालुक्यातील भरतगाव येथील महिला कॉन्स्टेबलला कोरोना झालाय या अफेवेमुळे एका महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या कुटुंबालाच फटका बसलाय. महिलेस खोकला व सर्दी असल्याने ही सुट्टी घेऊन आपल्या घरी भरतगाव या ठिकणी आली होती, मात्र खोकला असल्याने तिला कोरोना झालाय या अफवेने गावातील लोक पाणीही देत नाही.अत्यावश्यक गोष्टी देण्यास टाळाटाळ करत असल्याचे या महीलेने सांगितले आहे. महिलेला कोरोना झाला नसून तसे तिला सर्टिफिकेट देखील देण्यात आले असून अफवा पसरवणार्‍यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक शशिकांत इरवाडकर यांना सांगितले