शरीरातील ‘अपवित्र’ आत्मा बाहेर काढण्याच्या इराद्यानं पुजार्‍याकडून 21 वर्षीय गायिकेवर बलात्कार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – 21 वर्षीय गायिकेवर पुजाऱ्याने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घरात सुख, समृद्धी आणि व्यवसायवृद्धी पूजा करण्याच्या बाहण्याने पुजाऱ्याने गायिकेवर बलात्कार केला. ही घटना मुंबईतील चारकोप परिसरात घडली. पोलिसांनी या प्रकरणी पुजाऱ्याला ताब्यात घेतले आहे आणि त्याची चौकशी सुरु आहे.

पीडित महिलेच्या शरीरात अपवित्र आत्मा असल्याची भीती घालत तिच्यावर लैगिंक अत्याचार केले, परंतु आपल्यासोबत चुकीचा प्रकार घडल्याचे लक्षात आल्यावर पीडित महिलेने सर्व प्रकार आपल्या पतीला सांगितले, त्यानंतर पीडितेच्या पतीकडून चारकोप पोलिसात पुजाऱ्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.

पीडिता आणि तिचा पती काही महिन्यांपासून गृहप्रवेशाच्या पूजेसाठी ज्योतिषाच्या शोधात होते. व्यावसायात भरभराट व्हावी म्हणून दोघांनी एका मित्राची मदत मागितली होती. तेव्हा त्यांना घरात होमहवन करण्याचा सल्ला मिळाला. त्यावेळी त्याच परिसरात राहणाऱ्या आरोपी उमेश पांडेशी दोघांची ओळख झाली. त्यानुसार पीडितेने रविवारी पांडेला पूजेसाठी घरी बोलावले. पूजेचे साहित्य आणण्यासाठी पती घराबाहेर गेला. तेव्हा पांडे पीडितेला म्हणाला की तुझ्या शरीरात एक अपवित्र आत्मा आहे. त्यामुळे तुम्हाला व्यावसायिक वृद्धी नाही. अपयश येणार, तुला शरीरातील अपवित्र आत्मा बाहेर काढण्यासाठी निर्वस्त्र व्हावे लागेल. त्यानंतर याचीच भीती घालून पांडेकडून पीडितेवर बलात्कार केला.

पीडित गायिका रिमिक्स अल्बमसाठी काम करते, तिचा पती संगीतकार आहे. चारकोप परिसरात दोघे भाड्याच्या घरात राहतात, पीडितेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. मंगळवारी या आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाकडून पुजाऱ्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

फेसबुक पेज लाईक करा –