सफरचंदाची वाहतूक करणारा ट्रक उंब्रज येथे उलटला

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   आशियाई महामार्गावर उंब्रज ता.कराड येथील तारळी पुलानजीकच्या वळणावर सफरचंदाच्या पेट्या घेवून जाणाऱ्या ट्रकला गुरुवारी सकाळी ८.३० वा. च्या सुमारास अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्ताच्या दुभाजकाला धडकुन उलटला. या अपघातात ट्रक चालक किरकोळ जखमी झाला आहे. दरम्यान अपघातानंतर महामार्गावर सफरचंदाचे बाँक्स विखुरले होते. घटनास्थळी पोलीस येई पर्यत अनेकांनी त्याच्यावर हात मारला याची उलटसुलट चर्चा नागरीकांमध्ये सुरू होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, आशियाई महामार्गावर उंब्रज येथील तारळी नदीच्या पुलावरील वळणावर काश्मिरहुन सफरचंद भरून बैगलोंरला निघालेला ट्रक सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास अचानक महामार्गावरील दुभाजकाला धडकुन पलटी झाला. या अपघातात ट्रकचालक किरकोळ जखमी झाला आहे. सदर ट्रकमध्ये सफरचंदाने भरलेल्या सुमारे एक हजार पेट्या होत्या अपघातानंतर त्या रस्त्यावर विखुरल्या होत्या. त्यावर काही बघ्यांनी हात साफ केला. उंब्रज पोलीस तसेच हायवे हेल्पलाइनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी मदत कार्य केले.